Farmer's Protest: शेतकऱ्यांच्या आंदोलनात मसाज पार्लर नंतर आता उभी राहिली जिम; वेटलिफ्टरपासून ते कबड्डीपटूपर्यंत अनेक तरुण करत आहेत व्यायाम (See Photos)
शेतकरी आंदोलनात जिम (Photo Credit : ANI)

देशातील अनेक राज्यांतील शेतकरी गेल्या 17 दिवसांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन (Farmers Agitation) करत आहेत. सध्या शेतकऱ्यांनी सिंघू सीमेवर तळ ठोकला आहे. या आंदोलनाला भारतासह इतरही काही देशांमधून पाठींबा मिळत आहे. याआधी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी ‘रोटी मेकर’चा वापर होत असलेला दिसून आला होता. त्यानंतर या आंदोलनात मसाज पार्लरही दिसून आले व आता इथे चक्क जिम (Gym) उभी राहिली आहे. पैलवान तसेच कुस्तीपटूंनी सिंघू सीमेवरच व्यायाम करण्यास सुरूवात केली आहे.

आंदोलनस्थळी खेळाडूंनी तात्पुरती जिम स्थापित केली आहे. पंजाब वेटलिफ्टरपासून ते कबड्डीपटूपर्यंत अनेक तरुण इथे व्यायाम करत आहेत. स्वत: व्यायाम करण्याशिवाय ते शेतकऱ्यांनाही व्यायाम करायला शिकवत आहेत. जर सरकार आमच्या मागण्यांशी सहमत नसेल तर ते येथेच कबड्डीचे मैदान उभारले जाईल, असे तरुणांचे म्हणणे आहे. सध्या या जिमचे व्हिडिओ व फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ट्रॅक्टर्सच्यामधे एका तंबूमध्ये ही जिम उभी केली आहे. याबाबत रूपनगर येथील जसप्रीत सिंह म्हणतात, ‘जिम हे आमच्या रोजच्या रुटीनचा एक भाग आहे म्हणून आम्ही येथे एक जिम सेट लावण्याचे ठरविले. लोक त्यांच्या सोयीनुसार जिमला भेट देतात व व्यायाम करतात.’

पंजाब हे ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्यामध्ये व्यायाम आणि जिम हा एक महत्वाचा भाग आहे. इथल्या जवळजवळ प्रत्येक युवकाच्या जीवनात जिमला अनन्यसाधारण महत्व आहे. आंदोलनावेळीही यामध्ये खंड पडू नये म्हणून सीमेवर ही जिम उभारण्यात आली आहे. (हेही वाचा: सर्वेक्षणात समोर आले 'गुजरात मॉडेल'चे सत्य; कोरोना कालावधीत 21% लोकांना एकवेळचे जेवणही मिळालेले नाही)

दरम्यान, शेतकऱ्यांचे हे शेतीविषयक बाबींबद्दल आंदोलन चालू आहे. यामुळे सामान्य जनेतला अनेक असुविधा होत आहे. मात्र मसाज पार्लर, जिम यामुळे हे आंदोलनाचे ठिकाण लोकांच्या मनोरंजनाचे ठिकाण बनत असल्याची टीका सोशल मिडियावर होत आहे. त्यानंतर इथे लंगर म्हणून पिझ्झा पार्टी होत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता, त्यानंतर या टीकेमध्ये  अजूनच भर पडली आहे.