
कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाचा परिणाम सध्या अर्थव्यवस्थेवर देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहे. दरम्यान अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत तर तळहातावर पोट असणार्यांची अवस्था बिकट झाली आहे. यामध्ये कर्जाच्या बोझ्याखाली असणार्यांना मोठा फटका बसला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये दाहोद जिल्ह्यांतही अशाचप्रकारे एका कुटुंबाने कर्जाच्या तणावाखाली येऊन विष पिऊन आयुष्य संपवल्याची मनाला विषण्ण करणारी घटना समोर आली आहे. दरम्यान News18 हिंदीच्या बातमीनुसार त्यांची विष प्राशन केल्याने त्यांचे मृतदेह काळे निळे पडले होते.
कुटुंबाने आत्महत्या केल्याचे समोर येताच स्थानिक पोलिस तेथे पोहचले. त्यांना घरात 5 जणांचे मृतदेह आढळले. यामध्ये पती, पत्नी सोबत 3 चिमुकल्यांचा समावेश आहे. सर्वात लहानग्याचं वय 7 वर्ष आहे. सध्या त्यांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टम साठी पाठवले आहेत.
सुरूवातीच्या तपासणीमध्ये परिवाराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना आर्थिक चणचण जाणवत असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर कर्जाचादेखील बोझा होता. त्या दबावातूनच आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला असावा.
दरम्यान काल गुजरातमध्ये एका 17 वर्षीय मुलाने देखील पबजी खेळण्यावरून वडील ओरडले म्हणून विष प्यायल्याची घटना समोर आली आहे.
एप्रिल ते जून दरम्यान करण्यात आलेल्या अभ्यासामधील निष्कर्षानुसार, लॉकडाऊनच्या काळात लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुंबई शहरातील स्थिती तणावाची असल्याचं सांगण्यात आले आहे.