मुस्लिम तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर गौतम गंभीर भडकला; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
Gautam Gambhir (Photo Credits: ANI)

दिल्लीतील गुरुग्राम (Gurugram) येथील मुस्लिम युवकाला झालेल्या मारहाणीनंतर भाजपचा नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीर चांगलाच भडकला आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, "आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. येथे जावेद अख्तर यांनी 'ओ पालन हारे, निर्गुण और न्यारे' यासारखे गीत लिहिले. तर राकेश मेहरा यांनी 'अर्जियां' सारखे गाणे लिहिले." त्यामुळे मारहाणी सारखे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी गौतम गंभीर याने केली आहे.

गुरुग्राम येथे एका मुस्लिम व्यक्तीला त्याची पारंपारिक टोपी काढायला सांगत जय श्रीराम म्हणण्यास सांगितले, हे अतिशय वाईट असल्याचे गौतम गंभीर याने सांगितले. गुरुग्राम येथील अधिकाऱ्यांनी यावर कठोर पाऊल उचलावी, असेही तो म्हणाला.

गौतम गंभीर ट्विट:

घटनेनंतर पीडित तरुणाने तक्रार दाखल केली असून  पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

पीडित युवकाचे नाव बरकत आलम असून तो बिहार मधील बेगुसराय येथील रहिवासी आहे. रमजानचा पवित्र महिना सुरु असल्याने तो गुरुग्राम येथील जामा मशीदीत रात्री दर्शनासाठी आला होता. नमाज पडून परतत असताना त्याला रस्त्यात काही युवकांनी अडवत टोपी काढण्यास सांगितले आणि जय श्रीराम म्हणण्यास भरीत पाडत मारहाण देखील केली.