Elon Musk India Visit: काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी ‘टेस्ला’ (Tesla) भारतात येण्याची तयारी सुरू झाली आहे. लवकरच कंपनीची एक टीम भारत दौऱ्यावर येणार असून, यावेळी ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये टेस्ला प्लांट्स उभारण्यासाठी जागेचा शोध घेतील. आता अहवालानुसार, टेस्ला प्रमुख एलोन मस्क (Elon Musk) एप्रिल महिन्यात भारत दौऱ्यावर येत असून या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. असे मानले जाते की, त्यांच्या भारत भेटीदरम्यान ते देशातील गुंतवणूक योजनेचे अनावरण करू शकतात आणि नवीन टेस्ला प्लांट बांधण्याची घोषणा देखील करू शकतात.
माहितीनुसार, टेस्ला भारतात आपल्या नवीन प्लांटसाठी 2-3 अब्ज डॉलर्सची, म्हणजेच अंदाजे 25 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. रॉयटर्सने आपल्या अहवालातील सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, व्यक्ती एलोन मस्क 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात भारताला भेट देणार आहेत.
या दौऱ्यात ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत आणि या बैठकीनंतर ते स्वतंत्रपणे भारतात गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या योजनांचा खुलासा करतील. पंतप्रधान कार्यालय आणि टेस्ला यांनी या मुद्द्यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. अहवालानुसार, महाराष्ट्र आणि गुजरातने टेस्लाला आपापल्या राज्यात कारखाना उभारण्यासाठी जमिनीसह आकर्षक ऑफर दिल्या आहेत. याशिवाय तेलंगणा सरकारदेखील आपल्या राज्यात ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणण्यासाठी बोलणी करत आहे. टेस्ला टीम गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांना भेट देऊ शकते.
Looking forward to meeting with Prime Minister @NarendraModi in India!
— Elon Musk (@elonmusk) April 10, 2024
मिडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला भारतात इलेक्ट्रिक कारसह बॅटरी स्टोरेज सिस्टीम तयार आणि विकू इच्छित आहे. यासाठी कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला होता. दरम्यान, टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सरकारला त्यांच्याकडून स्थानिक उत्पादनासाठी वचनबद्धता हवी आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा मस्क यांनीही त्यांची भेट घेतली होती.