तेलंगणामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर कामगारांची दिवाळी; सरकारी स्टार्टअप कंपनी Singareni Collieries च्या कर्मचाऱ्यांना तब्बल 1.01 लाख रुपयांचा बोनस
Ganga Dussehra 2019 (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या वेळी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना बोनस (Bonus) दिला जातो. काही ठिकाणी इतर सणांना हा बोनस वाटला जातो. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर तेलंगाना (Telangana) मधील सरकारी स्टार्टअप कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस (Dussehra 2019 Bonus) जाहीर केला आहे. तेलंगणातील सिंगारेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड (SCCL) आपल्या कामगारांना तब्बल 1.01 लाख रुपयांचा बोनस देणार आहे. 2018-19 या वर्षात राज्यात कोळसा खाण कामगारांनी तब्बल 1,765 कोटी रुपयांचा नफा मिळवून दिला असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांनी एससीसीएलच्या मागील पाच वर्षातील प्रगतीबाबत कामगारांना श्रेय दिले. याबाबत बोलताना ते म्हणाले, 'राष्ट्रीय संपत्ती निर्माण करण्यात कामगार त्यांचे आयुष्य धोक्यात घालवत आहेत, या कामगारांचे हे कृत्य सीमेवर असलेल्या सैनिकांपेक्षा कमी नाही.' याच कारणामुळे राज्य सरकारतर्फे एससीसीएल कामगार व कर्मचार्‍यांना दसरा उत्सव भेट म्हणून हा बोनस देण्यात येणार आहे. मागील वर्षी देण्यात आलेल्या 40, 000 रुपयांच्या तुलनेत यंदाच्या बोनस रकमेच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे.

तेलंगणाच्या विकासासाठी खाण कंपनी आणि इथले कामगार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचेही राव म्हणाले. सध्या या कंपनीकडे सुमारे 48,000 ची वर्क फोर्स आहे. एससीसीएल कामगारांच्या हितासाठी राज्य सरकार नेहमीच उपाययोजना करत असते. तेलंगणा स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, 2013-14 मधील 13, 540 रुपयांच्या बोनस वरून हळू हळू हा बोनस वाढत इतका झाला आहे. ही खचितच राज्यासाठी आणि कामगारांसाठी फार मोठी बाब मानली जात आहे.

एससीसीएलने 2013-14 मध्ये 50.47 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले. गेल्या पाच वर्षात दरवर्षी उत्पादन वाढत आहे. 2018-19 मध्ये कोळशाचे उत्पादन आतापर्यंतच्या उच्चांकी म्हणजेच, 64.41 दशलक्ष टनांवर गेले आणि कंपनीला 1,765 कोटी रुपयांचा नफा झाला.