Madhya Pradesh Dindori Accident: मध्य प्रदेश राज्यातील डिंडौरी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 14 जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. बडझर घाटात गुरुवारी (29 फेब्रुवारी) मध्यरात्री दीड वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार अपघातात जखमी आणि मृत झालेले सर्वजण एका पिकअप वाहनाने प्रवास करत होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटले (Pickup Vehicle Overturned) आणि ही घटना घडली. डिंडौरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु आहे. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून नुकसानभरपाईची घोषणा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अपघाताची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांप्रती तीव्र दु:ख आणि जखमींना लवकर आराम मिळावा अशी मागणी केली आहे. जखमींवर आवश्यक आणि योग्य उपचारांसाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया मंच X हँडलद्वारे दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh Accident: बलियामध्ये पीकअप आणि कारच्या धडकेत भीषण रस्ता अपघात, 6 जणांचा मृत्यू, 9 गंभीर जखमी)
देवदर्शनावरुन परतताना काळाचा घाला
प्राप्त माहितीनुसार, अपघातातील मृत आणि जखमी डिंडौरी जिल्ह्यातील शाहपुरा तालुक्यातील रहिवासी आहेत. हे सर्वजण मिळून देवरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनावरु परतत असताना त्यांच्यासोबत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच डिंडौरीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदत आणि बचावकार्य सुरु केले. (हेही वाचा, Accident Video: पूर्वांचल एक्स्प्रेस मार्गावर टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात, दोन महिला जागीच ठार, 4 जखमी)
भीषण अपघाताचा प्रत्यक्षदर्शींना धक्का
दरम्यान, अपघात इतका भीषण होता की, अनेकांचे मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आले. त्यामुळे काही मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले. काही मृतदेहांची ओळख पटली असून उर्वरीत मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, जखमींनाही तातडीने वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत. घडलेल्या घटनेची माहिती मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. जखमींना आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार, असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
व्हिडिओ
#WATCH | Madhya Pradesh: 14 people died and 20 injured after a pick-up vehicle lost control and overturned at Badjhar ghat in Dindori. Injured are undergoing treatment at Shahpura Community Health Centre: Vikas Mishra, Dindori Collector
(Visuals of the injured who are undergoing… pic.twitter.com/24CjMnprEb
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 29, 2024
रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेकदा रस्ते अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. सरकारी पातळीवरही याबाबत अनेक उपाययोजना नेहमीच चर्चिल्या जातात परंतू, तरीही रस्ते अपघात होतच असतात. यासाठी अनेकदा चुकीच्या पद्धतीने प्रवास, प्रवासासाठी चुकीच्या वाहनाची निवड, चालकाचे पुरेसे प्रशिक्षण झालेले नसणे, चालकांना पुरेसा अनुभव नसणे यांसारख्या अनेक बाबींचा अपघातांच्या कारमांमध्ये समावेश असल्याचे आढळून येते.