Dhanteras 2020: Paytm, GooglePay आणि Broker Firms च्या माध्यमातून कशी कराल डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक? जाणून घ्या
Gold (photo Credits: PTI)

धनतेरस (Dhanteras) हा सोने खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशी निमित्त सोने-चांदीच्या वस्तू खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडते. परंतु, यंदा कोविड-19 (Covid-19) चे संकट आणि त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक समस्या यामुळे सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच धनतेरस निमित्त गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी खरेदी होईल, असा अंदाज आहे. परंतु, तरीही धनतेरसपूर्वी देशातील सराफ बाजार सजला असून उत्सव खरेदीसाठी पूर्णपणे तयारी केली आहे. दरम्यान, एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs), गोल्ड म्यूचुअल फंड, सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGBs) आणि डिजिटल गोल्डच्या (Digital Gold) माध्यमातून तुम्ही सोन्यात गुंतवणूक करु शकता.

कोविड-19 संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सोने खरेदीसाठी दुकानात जाणे टाळत असाल तर डिजिटली सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करु शकता. (Sovereign Gold Bond Scheme: दिवाळी, धनतेरसच्या पार्श्वभूमीवर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; आजपासून सरकार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीमच्या 8 व्या सीरीजला सुरूवात)

डिजिटल गोल्ड म्हणजे काय?

डिजिटल किंवा पेपर गोल्ड ही एका प्रकारची गुंतवणूक असून गरजेच्या काळी तुम्ही याची विक्री करु शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी 1 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता.

डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक कशी कराल?

डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी दोन पर्याय आहेत. मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म पेटीएमचे डिजिटल गोल्ड आणि स्टॉक होल्डिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया (Stock Holding Corporation of India) द्वारे सादर करण्यात आलेले 'गोल्डरश.' हे दोन्हीही पर्याय MMTC - PAMP यासोबत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ग्राहक Kuvera, Groww आणि इतर माध्यमातूही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करु शकतात.

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का?

तज्ञांनुसार, डिजिटल गोल्ड हा गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय आहे. तुमच्या डिजिटल अकाऊंटमध्ये जमा झालेले प्रत्येक ग्रॅम गोल्ड हे वास्तविक स्वरुपातील सोन्याप्रमाणे आहे.

सॉवरेन गोल्ड बांड:

सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2020-21 मालिका VIII 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ती 13 नोव्हेंबरला बंद होईल. यात तुम्हाला 5,177 रुपये प्रती ग्रॅम सोने मिळत आहे. तर ऑनलाईन सब्सक्रिप्शनवर 50 रुपये प्रती ग्रॅम डिस्काऊंट मिळत आहे. यावरुन असे दिसून येते की, या योजनेत सुरुवातीला गुंतवणूक केलेल्यांची गेल्या पाच वर्षात 93% वाढ झाली आहे.

दरम्यान, यंदा धनतेरस निमित्त डिजिटल सोन्यात गुंतवणुक करण्याचा मार्ग तुमच्यासमोर खुला आहे. त्यामुळे इच्छुक याचा नक्कीच लाभ घेऊ शकतात.