Dog Attack | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एका कुत्र्यापासून स्वतःचा बचाव करण्याच्या नादामध्ये हैदराबादमध्ये एका डिलिव्हरी बॉयने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना हैदराबाद मधील मनिकोंडा च्या पंचवटी कॉलनी मधील आहे. काल 21 मे दिवशी रविवारी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॅब्रेडोर जातीचा कुत्रा होता. तो भुंकायला लागल्यानंतर डिलेव्हरी बॉय घाबरला. मोहम्मद इलियास असं या डिलेव्हरी बॉयचं नाव असून तो 27 वर्षीय आहे. मोहम्मद कडे कुत्रा येताच तो घाबरून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना चक्क तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून खाली कोसळला.

अमेझॉन साठी मोहम्मद काम करत आहे. तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी मारल्याने त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्यानंतर त्याला नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोहम्मदच्या जीवाला काही धोका नाही. त्याची तब्येत स्थिर आहे. मात्र या प्रकरणी रायदुर्गम पोलिसांनी मोहम्मदचा जबाब नोंदवून घेतला आहे.

आज 22 मे दिवशी पोलिस फ्लॅट मालकाच्या विरूद्ध कारवाईसाठी दाखल झाले आहेत. घर मालजाविरूद्ध आयपीसीच्या कलम 289 - प्राण्यांबाबत निष्काळजी बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तेलंगणाच्या गिग एंड प्लेटफॉर्म वर्कर्स यूनियन (टीजीपीडब्ल्यूयू) च्या अध्यक्ष शैक सलाहुद्दीन यांनी मागणी केली आहे की कुत्र्याच्या मालकाने संबंधित डिलेव्हरी एजंटच्या उपचारांचा खर्च उचलावा. हैदरामधील ही मागील चार महिन्यातील दुसरी घटना आहे.

कुत्र्याला घाबरून जीव वाचवण्यासाठी उडी मारण्याच्या नादात अशाच एका 23 वर्षीय डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाला होता. कुत्र्यापासून स्वतःला वाचवताना उडी मारल्याने जखमी झालेला मोहम्मद रिजवान उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. Dog Attack in Noida: नोएडात सोसायटीच्या लिफ्टमध्ये दोन मुलांवर पाळीव कुत्र्याचा हल्ला, पहा व्हिडिओ .

टीजीपीडब्ल्यूयूने कुत्र्यांच्या मालकांना आवाहन केले आहे की जेव्हा डिलिव्हरी एजंट त्यांच्या ऑर्डर देण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्या पाळीव कुत्र्यांना पट्ट्याने बांधून ठेवावे. इलियास ऑन ड्युटी असताना जखमी झाल्याने त्याच्या उपचारादरम्यान अॅमेझॉनने त्याला प्रतिदिन 1000 रुपये वेतन द्यावे, अशी मागणीही युनियनने केली आहे.

सलाहुद्दीन यांनी महापालिका प्रशासन मंत्री के.टी. रामाराव आणि ग्रेटर हैदराबादच्या महापौर विजयालक्ष्मी गडवाल यांना अशा प्रकरणांमध्ये कुत्र्यांच्या मालकांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.