जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azhar) याला संयुक्त राष्ट्रामध्ये जागतिक आतंकवादी घोषणा करण्याच्या वेळेस चीनने (China) भारताला दगा देत पाकिस्तानला छुपी मदत केली आहे. या प्रकारानंतर आता देशभरातील व्यापार्यांनी एकत्र येऊन चीनी मालाविरूद्ध मोहिम छेडली आहे. कॉन्फ़ेडरेशन ऑफ़ आल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या व्यापार्यांनी देशभरातील चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये 19 मार्च दिवशी बारा टूटी चौक परिसरामध्ये दुपारी 12 वाजता चीनी वस्तूंची होळी करण्यात आली आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया, राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता चीनला पाकिस्तानला मदत करण्याची किंमत चुकवण्याची वेळ आली आहे. चीनसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे जर चीनला आपण भारतीय बाजारपेठेमध्ये स्थान दिले नाही तर सहाजिकच त्यांची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळे कॅटने चीनी माल न विकण्याचा आणि खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅटच्या या राष्ट्रीय अभियानामध्ये ट्रांन्सपोर्ट, लघू उद्योग, हॉकर्स इत्यादी राष्ट्रीय संघटनांना जोडण्याचा विचार करण्यात आला आहे.