INX Media Case: पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर; देश सोडण्यास मनाई
P Chidambaram (Photo Credits: IANS)

INX Media Case मध्ये अटकेत असलेले कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन सशर्त असून 2 लाखांच्या जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांची आज दिल्लीच्या तिहार जेलमधून सुटका होणार आहे. दरम्यान त्यांना भारत देश सोडून जाण्यास मनाई आहे. 21 ऑगस्ट 2019 दिवशी चिदंबरम यांना दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी नाट्यमयरित्या अटक झाली होती. त्यानंतर जामीनासाठी केलेल्या अर्जावर वारंवार सुनावणी झाली मात्र त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा होत नव्हता. परंतू आज ईडी गुन्ह्यामधूनदेखील चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे.

आयएनएक्स मीडिया समूहाला 2007 मध्ये 305 कोटी रुपये विदेशी धन प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाच्या मंजुरीत अनियमितता आढळून आली होती. याचदरम्यान पी चिदंबरम अर्थ मंत्री होते. या गैर व्यवहारप्रकरणी पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम.

ANI Tweet

आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग आरोपाखाली ईडीने कार्ती चिदंबरम (पी. चिदंबरम यांचे पुत्र) यांची 54 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर इंद्राणी मुखर्जी यांना माफीच्या साक्षीदार बनत त्यावेळी नक्की काय घडले ते सांगितले. दरम्यान 20 ऑगस्ट 2019 ला दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांचा अंतरिम जामीन फेटाळून लावला. त्यानंतर 27 तास गायब असलेल्या पी. चिदंबरम यांना 21 ऑगस्टच्या रात्री दिल्लीत जोरबाग येथील घरातून अटक झाली. यानंतर अनेकदा त्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. कॉंग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व गांधी कुटुंबीयांनी त्यांची तिहार जेलमध्ये भेट घेतली होती.