राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह| Photo Credits: ANI

भारताच्या संसदेतील राज्यसभेमध्ये रविवारी कृषी विधेयकावरून झालेल्या गोंधळानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी 8 संबंधित खासदारांचे पुढील आठवडाभरासाठी निलंबन केले आहे. दरम्यान याप्रकरणी आता निषेध नोंदवण्यासाठी काल रात्रभर राज्यसभा खासदारांनी संसदेच्या परिसरात राहून आंदोलन केले आहे. या आंदोलनाची दखल घेत आज सकाळी राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह त्यांच्यासाठी चहा घेऊन पोहचले. मात्र खासदारांनी चहा आणि नाश्ता घेण्यास नकार दिला आहे.

निलंबित 8 खासदारांमध्ये महाराष्ट्राचे कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांचादेखील समावेश आहे. त्यांचा काल वाढदिवस होता. मात्र यंदा त्यांच्या वाढादिवसाच्या दिवशी त्यांनीदेखील इतर खासदारांसोबत आंदोलनात सहभाग घेतला होता. निलंबित खासदारांची मागणी आहे की कृषी विरोधी विधेयक पुन्हा मागे घ्यावे, खासदारांचे निलंबन मागे घ्यावे. दरम्यान विरोधक पक्षांकडून काल कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खर्गे आणि गुलाम नबी आजाद यांनी त्यांची भेट घेतली आहे.

महाराष्ट्रातील कॉंग्रेस खासदार राजीव सातव सोबतच डेरेक ओ'ब्रायन, संजय सिंह, के.के. रागेश, रिपुन बोरा, डोला सेन, सैयद नजीर हुसैन आणि एलामरम करीम यांचे निलंबन झाले आहे.

राज्यसभा उप सभापती हरिवंश 20 सप्टेंबरला काही  खासदारांनी केलेल्या गैर व्यवहाराच्या निषेधार्थ 24 तासांचा उपवास ठेवणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान आज सकाळी हरिवंश यांनी नाश्ता नेऊन त्यांनी दाखवलेल्या विनम्रतेची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दखल घेतली आहे. दरम्यान त्यांनी त्याबाबत ट्वीट केले आहे.