स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना रोज कानी पडत असतात. यामध्ये प्रामुख्याने बलात्काराच्या (Rape) घटनांचे प्रमाण अधिक आहे. आता राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये होणाऱ्या अशा घटनांबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी संसदीय समितीला (Parliamentary Panel) माहिती दिली की, राजधानीतील बलात्काराच्या 98% घटनांमध्ये आरोपी हे पिडीतेचा जवळचा नातेवाईक किंवा तिच्या ओळखीचा इसम होता. कॉंग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गृहसभेच्या स्थायी समितीसमोर दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली पोलिस, गृह मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी समितीच्या बैठकीपूर्वी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या सभेचा अजेंडा महिलांविरोधी गुन्हेगारीतील वाढीबाबत विचार करण्याचा होता. दिल्ली पोलिसांनी समितीला सांगितले की, दिल्लीतील बलात्काराच्या एकूण घटनांपैकी 44 टक्के आरोपी कुटुंबातील सदस्य किंवा कौटुंबिक मित्र आहेत, 13 टक्के प्रकरणात आरोपी हे नातेवाईक आणि 12 टक्के शेजारी होते. 26 टक्के प्रकरणांमध्ये आरोपीला पीडित व्यक्ती आधीपासूनच माहित हिती, 3 टक्के प्रकरणांमध्ये आरोपी एकतर मालक किंवा सहकारी होते. केवळ दोन टक्के प्रकरणांमध्ये आरोपी अज्ञात व्यक्ती असल्याचे आढळले आहे.
सूत्रांनी सांगितले की, समितीच्या बैठकीत सदस्यांनी महिलांविषयी संवेदनशीलता वाढविणे आणि जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे सुचविले. या बैठकीस उपस्थित असलेल्यांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव, दिल्ली पोलिस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव आणि विशेष पोलिस आयुक्त नुजत हसन यांचा समावेश होता. (हेही वाचा: धक्कादायक! विधवा महिलेचा पुनर्विवाहास नकार; संतापलेल्या सासरच्या मंडळींनी कापले नाक व जीभ)
यापूर्वी गृहमंत्रालयाच्या अधिकार्यांनी गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीला सांगितले होते की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 7.3 टक्क्यांनी वाढले आहे. याचे मोठे कारण म्हणजे लोकांमध्ये, विशेषत: स्त्रियांमध्ये जागरूकता आली आहे व पोलिसांकडे एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुकर झाली आहे. याचाच अर्थ महिला अत्याचार सहन करण्याऐवजी त्या विरुद्ध आवाज उठवत आहेत.