दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र जैन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. जैन यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आता ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. जैन यांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार असल्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. सत्येंद्र जैन यांना उपचारासाठी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आप नेता आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या फुफ्फुसातील इन्फेक्शन अधिक वाढत असल्याने त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मॅक्स रुग्णालयात हलवण्यात येत आहे. तेथे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोना विषाणूची लागण; रुग्णालयात उपचार सुरु)
Delhi Minister Satyendar Jain being shifted to Saket's Max Hospital, where he will be administered Plasma therapy for COVID19. https://t.co/ct4Yu3heT9
— ANI (@ANI) June 19, 2020
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य मंत्री जैन यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत असे म्हटले आहे की, सीटी स्कॅन रिपोर्ट्स नुसार असे निदान झाले की त्यांच्या फुफ्फुसातील न्युमिनियाचे प्रमाण वाढले आहे. त्यांना सकाळपासून थकवा आणि चक्कर येण्यासाठी समस्या जाणवत आहे. त्यांच्यावर उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्यात येत आहे.
मंगळवारी जैन यांच्या शरीरातील तापाचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या ऑक्सिजनच्या स्तरात घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जैन यांना राजीव गांधी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर 55 वर्षीय आप नेता यांच्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली होती. मात्र त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. मुख्यमंत्र्यांना ताप आणि घसा दुखत असल्याची समस्या जाणवत होती.