Petrol-Diesel Price: केजरीवाल सरकारने वाढवला VAT; पेट्रोलच्या किंमतीत 1.67 आणि डिझेलच्या दरात 7.10 रुपयांची वाढ
Petrol pump (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) मध्ये थोडे नियम शिथिल करून दारूची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र आजपासून दिल्ली (Delhi) सरकारने दारूवर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना फी’ (Special Corona Fees) कर आकारण्याची घोषणा केली. हा धक्का लोक पचवत असतानाच आता दिल्लीच्या केजरीवाल सरकारने पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) वरील व्हॅट (VAT) वाढविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पेट्रोलवरील व्हॅटमध्ये प्रति लिटर 1.67 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी डिझेलवरही व्हॅटमध्ये मोठी वाढ होऊन, दिल्लीत आता डिझेलची किंमत 7.10 रुपयांनी वाढली आहे. आयओसीएलच्या वेबसाइटनुसार आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 71.26 रुपये तर, डिझेलची किंमत 62.29 रुपये लिटर असेल.

मागच्या वर्षी एप्रिल महिन्याच्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या एकूण वापरामध्ये सुमारे 70 टक्के घट झाली आहे. लॉकडाउन 3 मध्ये थोडा शिथिलता आली असल्याने आता पेट्रोल व डीझेलची मागणी वाढू शकते. सरकार आणि तेल कंपन्यांना आशा आहे की मे महिन्यात याचा परिणाम इंधन विक्रीवरही होईल. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 76.31 रुपये आणि 66.21 रुपये आहेत. दुसरीकडे, कोलकातातील लोकांना पेट्रोल प्रतिलिटरसाठी 73.30 रुपये व डिझेलसाठी 65.62 रुपये प्रतिलिटर मोजावे लागतील. (हेही वाचा: Coronavirus: दिल्लीत दारूच्या किंमती वाढल्या; सरकारने MRP वर लावला 70 टक्के ज्यादा 'स्पेशल कोरोना फी' कर)

सोमवारपासून देशातील अनेक शहरांमध्ये दारूची दुकाने उघडली गेली. मात्र यावेळी दुकानांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. दिल्लीच्या बर्‍याच भागात दारू विकत घेण्यासाठी बरीच गर्दी झाली होती व यावेळी चेंगराचेंगरीही झाली, तसेच सामाजिक अंतराचा नियम मोडला गेला. अशात दिल्लीत मंगळवारपासून दारू महाग होणार आहे. केजरीवाल सरकारने दारूवर ‘विशेष कोरोना फी’ आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एमआरपीवर ही फी 70 टक्के इतकी असेल.