Building Collapses in Sabzi Mandi Area (Pohoto Credits: ANI)

राजधानी दिल्लीच्या (Delhi) सब्जी मंडी परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात अनेक जण जखमी होण्याची भीती आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत तीन लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे, ज्यात दोन मुलांचा समावेश आहे. एका व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सब्जी मंडईच्या मलकागंज भागात झाला जिथे बांधकाम सुरू होते.

तळमजल्यावर दुधाचे दुकान सुरु होते. इमारत कोसळल्याने जवळपास उभी असलेली अनेक वाहनेही चिरडली गेली असल्याचे सांगितले जात आहे. भीती आहे की कारमध्ये कोणी असेल तर त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांचे संयुक्त सीपी (सेंट्रल रेंज) एनएस बुंदेला यांनी सांगितले की, पोलीस, एमसीडी आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी उपस्थित आहेत. इमारतीत अडकलेल्या लोकांबद्दल सध्या तरी कोणतीही माहिती नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

अपघातामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. याशिवाय, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जे हा अपघात झाला तो बाजार 100-150 वर्ष जुना आहे. अचानक झालेल्या पावसामुळे ही इमारत खचली व हा अपघात झाला.

या घटनेबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, मदतीसाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आपण वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. दिल्लीचे मुख्य अग्निशमन अधिकारी अतुल गर्ग यांनी आयएएनएसला सांगितले की, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (हेही वाचा: गुरुग्राममध्ये पत्नी आणि सासरच्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून खासगी रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या, आरोपींविरोधात तक्रार दाखल)

दरम्यान, काल ठाण्याच्या राबोडीमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. राबोडीच्या खत्री अपार्टमेंटमध्ये स्लॅब पडण्याच्या या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे व एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. यातून 75 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.