दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराने केजरीवाल यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. तसेच, या वेळी झालेल्या झापटीमध्ये केजरीवाल यांचा चष्माही तुटला. दरम्यान, केजरीवाल यांच्या सुरक्षारक्षकांनी मिरचीपूड फेकणाऱ्या व्यक्तीस पकडले आहे. आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी केजरीवाल यांच्या सुरक्षाव्यवस्थेच्या चुकीमुळेच हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.
प्राप्त माहिती अशी की, अरविंद केजरीवाल हे मंगळवारी (२० नोव्हेंबर) नेहमीप्रमाणे दिल्ली येथील सचिवालयात आले होते. ते आपल्या कार्यालयातून तीसऱ्या मजल्यावर भोजन करण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर एक युवक उभा होता. त्याने माचिस काडीच्या बॉक्समधून मिरचीपूड आणली होती. केजरीवाल कार्यालयाबाहेर येताच त्याने त्यांच्यावर हल्ला करत मिरचीपूड फेकली. दरम्यान, हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून,त्याला इंद्रप्रस्थ पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. अनिलकुमार शर्मा असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. (हेही वाचा, भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार, व्हिडिओ व्हायरल)
दरम्यान, आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीही सुरक्षीत नसल्याचे आरोप करत पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा प्रकार घडल्यावर आम आदमी पक्षाने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन ट्विट केले आहे की 'मुख्यमंत्री दिल्लीतही सुरक्षीत नाहीत.' दरम्यान, केजरीवाल यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला आहे. दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान केजरीवाल यांच्यावर एका महिलेने शाई फेकली होती. तर, आणखी एका रॅलीदम्यान एका रिक्षाचालकाने केजरीवाल यांना कानाकाली मारली होती.