Delhi Assembly Election-2020: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच 8 फेब्रुवारी 2020 या दिवशी मतदान पार पडत आहे. मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले असून, इथे आदर्श अचारसंहीताही लागू झाली आहे. दरम्यान, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत दिल्लीतील 132 मतदार आकर्षणाचा विषय ठरले आहेत. होय, दिल्ली विधानसभा निडणुकीसाठी मतदान करण्यास पात्र असलेल्या एकूण मतदारांपैकी तब्बल 132 मतदार हे शंभर वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. उल्लेखनीय असे की, शंभरीपार असलेल्या या मतदारांमध्ये एका 110 वर्षांच्या महिला मतदाराचाही समावेश आहे. ही महिला मतदार सर्वात ज्येष्ठ असल्याची माहिती आहे.
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालयाने या आधीर शंभरीपार असलेल्या मतदारांची संख्या 150 इतकी सांगितली होती. मात्र, या संख्येची पुन्हा पडताळणी केल्यावर सुधारीत आकडा प्रसारीत करण्यात आला आहे. दिल्ली निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, 'आमच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला शंभरीपार असलेल्या मतदारांचा आकडा 150 इतका सांगितला होता. मात्र, आता आम्ही पुन्हा एकदा पडताळणी केली आहे. त्यानुसार या 150 मतदारांतील काही मतदार आता या जगात नाहीत. त्यामुळे आता सुधारीत आकडा 132 इतका आहे. वयाची शंभर वर्षे पार असलेल्या या मतदारांमध्ये 68 पुरुष तर 64 महिलांचा समावेश आहे.' शंभरीपार असलेल्या मतदारांची सर्वाधिक मतदार हे पश्चिम दिल्ली मतदारसंघात आहेत. तर शंभरीपार असलेल्या मतदारांची सर्वात कमी संख्या नवी दिल्ली जिल्ह्यामध्ये आहे. इथे फक्त शंभरीपार 7 मतदार आहेत.
दक्षिण दिल्ली येथील ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघात सीआर पार्क येथील मतदार कालीतारा मंडल हे सर्वात ज्येष्ठ 110 वर्षीय मतदार आहेत. गेल्या वर्षी (2019) पार पडलेल्या निवडणुकीत 111 वर्षीय बच्चन सिंह हे सर्वात ज्येष्ठ मतदार होते. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचे निवडणुक आयुक्त रणबीर सिंह यांनी म्हटले आहे की, भारत स्काऊट अँड गाईड्सने शारीरिक चाचणी केली. या चाचणीत हे मतदार जिवंत आणि दिल्लीत राहात आहेत किंवा नाहीत हे तपासण्यात आले. (हेही वाचा, Delhi Assembly Election 2020: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत समाप्त; आता 8 फेब्रुवारीच्या मतदानावर देशाचे लक्ष)
दरम्यान, शंभर वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 150 मतदारांपैकी पैकी जे 18 मतदार जे या यादीत दिसत नाहीत. त्यातील काही हायात नाहीत तर काही दिल्लीबाहेर गेले आहेत. दरम्यान, मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या ज्येष्ठ मतदारांना गेल्या वेळी दिलेली सेवा याही वेळी दिली जाणार आहे. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यात यावा यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी या मतदारांच्या घरी जातील आणि ते मतदान करु इच्छित असतील तर त्यांना आवश्यक ती सर्व मदत देऊन मतदान केंद्रावर घेऊन येतील. मतदान केंद्रावर या मतदारांना पुष्पगुच्छ दिला जाईल आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसोबत सेल्फीही काढला जाईल.