Delhi Air Pollution: दिल्लीमधील हवेची गुणवत्ता कमालीची घसरल्याने शाळा आणि कॉलेजेस 5 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय
Air Pollution (Representational Image/ Photo Credits: PTI)

दिल्ली मधील हवेच्या गुणवत्तेची स्थिती 'गंभीर' झाल्या कारणाने दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने शाळा आणि कॉलेजेस 5 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ट्विट करत शेजारील राज्यांमध्ये जाळण्यात येणाऱ्या पेंढ्यांमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या पातळीमुळे हा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. दिल्ली सरकारचा हा निर्णय सार्वजनिक आयोग्यावर ओढवलेल्या आणीबाणीच्या अवस्थेमुळे घेण्यात आला आहे.

आज सकाळी दिल्ली एनसीआर मध्ये 'आरोग्य आणीबाणी'ची घोषणा करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण मंडळाने (Environment Pollution Prevention and Control Authority) बांधकामाच्या कार्यावर 5 नोव्हेंबर पर्यँत बंदी घातली आहे. तसेच उर्वरित हिवाळ्यामध्ये फटाके फोडणे आणि उडवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

 

(हेही वाचा. Delhi Air Pollution: निष्काळजी अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय)

 भारतातील हवा गुणवत्ता व हवनमान अंदाज आणि संशोधन प्रणालीच्या (System of Air Quality and Weather Forecasting And Research-SAFAR) मते, एअर क्वालिटी इंडेक्स सकाळी दिल्ली मध्ये 412 पर्यंत घसरला, जो की अत्यंत गंभीर श्रेणी मध्ये येतो. वायू प्रदूषण आणि धुक्यामध्ये पेंढा जाळण्याचे योगदान बुधवारी 35 % होते. गुरुवारी ते 24% वर आले. शुक्रवारी सुद्धा धुरामुळे वाढणाऱ्या धोक्याचे प्रमाण खुप जास्त आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून निर्णय घेण्याचं दिल्ली सरकारने ठरवले आहे.