दिल्ली: आप आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार, कार्यकर्ता ठार
Naresh Yadav Firing (Photo Credits: ANI)

महरौली मतदारसंघातून निवडून आलेले आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार नरेश यादव (Naresh Yadav) यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेला पक्षाचा एक कार्यकर्ता ठार झाला. नरेश यादव हे निवडून आल्यानंतर मंदिरातून परतत असताना हा हल्ला झाला. अशोक मान (वय 45) असं मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी या घटनेची माहिती ट्विटरद्वारे दिली. गोळीबारात आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Delhi Assembly Election Results 2020 Live Updates: मुंबईसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवण्याची महाराष्ट्र आपची घोषणा

प्राप्त माहितीनुसार,काल दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात महरौली मतदारसंघातून नरेश यादव यांचा विजय झाला आहे, काल निकालाच्या नंतर ते देवदर्शनासाठी गेले होते, यावेळी अन्य दोन कार्यकर्ते सुद्धा यादव यांच्या सोबत होते. ही सर्व मंडळी मंदिरातून परतत असताना हा हल्ला झाला. या प्रकरणी किशनगढ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. यादव यांनी ANI वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बंदुकीतून चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती दिली, तसेच ही घटना दुर्दैवी आहे, या घटनेमागील सूत्रधार कोण हे अद्याप समजलेले नाही मात्र मला खात्री आहे की लवकरच पोलीस याप्रकरणी तपास घेतील अशी आशा सुद्धा यादव यांनी व्यक्त केली.

पहा ट्विट

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ने आपला गड राखून पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 'आप'ने 70 जागांपैकी 62 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपने 8 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला मात्र भोपळाही फोडता आलेली नाही.