Dehradun: देहरादूनच्या 150 हून अधिक मंदिरांमध्ये लागले बॅनर- 'इथे गैर हिंदूंचा प्रवेश निषिद्ध आहे’
'Non-Hindus Not Allowed’ Banners in Uttarakhand (Photo Credits: Twitter)

देहरादूनच्या (Dehradun) दीडशेहून अधिक मंदिरांमध्ये काही बॅनर लावण्यात आले आहे, त्यावर लिहिले आहे की मंदिराच्या आवारात गैर हिंदूंचा प्रवेश निषिद्ध आहे. हिंदु युवा वाहिनी या दक्षिणपंथी संघटनेने ही बॅनर लावली आहेत. असे बॅनर संपूर्ण उत्तराखंडमधील मंदिरांमध्ये लावण्यात येतील, असा संघटनेच्या सदस्यांचा दावा आहे. सध्या ही बॅनर देहरादूनमधील चकराता रोड, प्रेम नगर आणि सुधोवाला येथे दिसली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. यापूर्वी असे बोर्ड गाझियाबादमधील डस्ना येथेही पाहिले गेले होते.

अलीकडे डसना येथील डसना देवीच्या मंदिरात एक मुस्लीम तरुण पाणी पिताना आढळला होता, त्यावेळी त्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. यावर मंदिराचे महंत येती नरसिंहानंद सरस्वती म्हणाले होते की, 'मंदिराच्या बाहेरील बोर्डावर स्पष्ट लिहिले आहे की मुस्लिमांना मंदिरात प्रवेश नाही, तरी हा तरुण मंदिरामध्ये आला. त्याला मंदिर अपवित्र करायचे होते.’ या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली. हिंदू युवा वाहिनीचे प्रदेश सरचिटणीस जीतू रंधावा म्हणाले की, येती नरसिंहानंद सरस्वती यांच्या समर्थनार्थ ही पावले उचलली जात आहेत.

डसना प्रकरणानंतर धौलानाचे बसपचे आमदार अस्लम चौधरी म्हणाले होते की, हे मंदिर त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर बांधले गेले आहे आणि ते मंदिरात जातील, तिथले पाणी पितील व मानिराच्या बाहेरील पोस्टर्स काढून टाकतील. यावर रंधावा म्हणतात की, अस्लम यांच्या धमकीचा निषेध करण्यासाठी आम्ही ही पोस्टर्स उत्तराखंडमधील प्रत्येक मंदिरात लावणार आहोत. सनातन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच हे मंदिर आहे आणि असेच लोक मंदिरात येऊ शकतात. (हेही वाचा: कोरोना गायत्री मंत्रामुळे ठिक होतो? केंद्र सरकारच्या मदतीने AIIMS ऋषिकेश करतायत रिसर्च)

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर डसना येथील मंदिराबाहेर अजून मोठा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र नंतर बसपाचे आमदार अस्लम चौधरी यांनी आणखी एका निवेदनात म्हटले आहे की, ते मंदिरात जाणार नाहीत. ही कायदा व सुव्यवस्थेची बाब असून पोलिस या प्रकरणामध्ये आपले काम करतील.