
दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती मॅट्रिमोनियल साइट्सवर (Matrimonial Sites) खोटी माहिती देऊन महिलांशी मैत्री करून त्यांना लग्नाचे आश्वासन देयाचा. महिला जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच त्यांची फसवणूक करून तो पळून जायचा. महत्वाचे म्हणजे अशाप्रकारे गेल्या अडीच वर्षांत त्यांचे 15 हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी याची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, अहमदाबाद येथील रहिवासी हिमांशू योगेशभाई पांचाळ याने महिलांना आमिष दाखवण्यासाठी या साइट्सवर बनावट प्रोफाइल तयार केले होते.
या साइट्सवर त्याने स्वतःला सायबर सुरक्षा विभागात संलग्न दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवले होते. पांचाळच्या बनावट प्रोफाइलमध्ये असेही नमूद केले होते की, तो एका श्रीमंत कुटुंबातील आहे आणि त्याच्याकडे अनेक मालमत्ता आहेत. तरुणींशी संपर्क साधल्यानंतर, तो त्यांना वसई, मुंबई आणि अहमदाबाद येथील हॉटेलमध्ये बोलावत असे, जिथे तो लग्नाचे आश्वासन देत असे, तसेच बनावट हिऱ्यांचे दागिने भेट देत असे आणि पहिल्याच भेटीत त्यांना त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडत असे.
नंतर, तो काही गरजेच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसेही वसूल करायचा, महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्यानंतर शेवटी त्यांच्याशी संपर्क करणे थांबवत असे. अहवालानुसार, 6 फेब्रुवारी रोजी मीरा रोड येथील एका 31 वर्षीय महिलेने वालीव पोलिसांकडे धाव घेतली तक्रार दाखल केली. महिलेने दावा केला की, पांचालने एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तिला हिऱ्याचा हार भेट देऊन तिचा विश्वास संपादन केला. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. हा हारही बनावट असल्याचे दिसून आले.
तिने वसई आणि अहमदाबादमधील दोन हॉटेल्सची नावे सांगितली जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरु केला व तांत्रिक तपासणीनंतर त्याला अहमदाबाद येथून अटक केली. वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप म्हणाले की, पांचाल हा गोड बोलणारा होता आणि त्याच्या चांगल्या इंग्रजीने तो महिलांना प्रभावित करत असे. त्याच्याकडे पाच फोन आणि एक अॅपल लॅपटॉप होता. तो कॉलसाठी नेहमीच हॉटेल्सचे वायफाय आणि व्हॉट्सअॅप वापरत असे. (हेही वाचा: Tamil Nadu Horror: पतीला चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार, बिहार येथील तीन स्थलांतरित कामगारांना अटक)
आरोपीच्या चौकशीदरम्यान, त्याने मॅट्रिमोनियल साइटद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून अशाच प्रकारे सुमारे डझनभर महिलांना फसवले असल्याचे समोर आले. महिलेच्या तक्रारीवरून, वालिव पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 64(2)(m) (बलात्कार) आणि 318(4) (फसवणूक) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.