Cyclone Shaheen: महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका; कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा
Cyclone | (Images for symbolic purposes only । Photo Credits: Pixabay)

गुलाब चक्रीवादळाचा (Cyclone Gulab) जोर ओसरल्यानंतर शाहीन चक्रीवादळाचा (Cyclone Shaheen) धोका निर्माण झाला आहे. हे वादळ अरबी समुद्रात (Arabian Sea) येणार असल्याने पश्चिम किनारपट्टीवर याचा परिणाम होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात (Gujarat) या दोन राज्यांना या चक्रीवादाळाचा धोका असून समुद्रकिनारी भागात राहणाऱ्या लोकांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. तसंच शाहीन वादळामुळे कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानुसार, शाहीन चक्रीवादळ गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी सकाळी पूर्वोत्तर अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, सौराष्ट्र आणि किनारपट्टीकडील भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  दरम्यान, शुक्रवार पर्यंत वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर वादळ भारतीय किनाऱ्यापासून दूर जात पाकिस्तान-मॅक्रान किनारपट्टीच्या जवळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे.

शाहीन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गुजरात मधील किनारपट्टीकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर 3 ऑक्टोबरपर्यंत बिहारमधील विविध ठिकाणी दमदार पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Monsoon Deaths: राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 1 जूनपासून 436 नागरिकांचा मृत्यू)

दरम्यान, 2 ऑक्टोबरपर्यंत उत्तर आणि लगतच्या मध्य अरबी समुद्र, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच मच्छिमारांनी देखील मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी आलेल्या गुलाब चक्रीवादळाने पश्चिम बंगाल, ओडिसा या राज्यांना झोडपून काढले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला.