Cyclone Michaung Updates: मिचॉंग चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशात पोहोचण्याची शक्यता, IMD ने वर्तवली चार राज्यांमध्ये पावसाचा अंदाज
Cyclone (Photo Credits: Pixabay)

IMD Weather Forecast On Cyclone Michaung News: मिचाँग चक्रीवादळ हळूहळू आपला प्रभाव वाढवताना दिसत आहे. जे आज (5 नोव्हेंबर) आंध्र प्रदेश राज्यात पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजासून या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून देशातील चार राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. खास करुन तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांलगतच्या राज्यांमध्येही वातावरणावर वादळाचा प्रभाव राहील. या राज्यांमध्ये ढगाळ हवामान, हलका, मध्यम ते काही भागांमध्ये दमदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

तामिळनाडू राज्यात गडगडाटी पाऊस

चेन्नईच्या प्रादेशिक हवामान कार्यालयाने म्हटले आहे की,  मिचॉंग चक्रीवादळ तामिळनाडूत प्रभावी ठरेल.  मंगळवारी सकाळी तामिळनाडू राज्यातील जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये वदळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता असलेल्यांमध्ये चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, रानीपेट आणि वेल्लोर जिल्ह्यांचा समावेश आहे. आयएमडीने आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, ''दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनार्‍यापासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील मिचॉंग वादळ गेल्या 06 तासांत 07 किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले. '' (हेही वाचा -Cyclone Michaung: मुसळधार पावसामुळे चेन्नईत भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू)

आंध्र प्रदेश सरकारकडून 2 कोटी रुपयांचा निधी

आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनासीमा आणि काकीनाडा या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव पाहता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रयत्नही सुरु केले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेकी, खास करुन चक्रीवादळ प्रभावित जिल्ह्यांसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याशिवाय बचाव आणि मदत कार्यासाठी प्रत्येकी ₹2 कोटी जारी करण्यात आले आहेत. विशेष अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधून काम करतील आणि, अधिक निधीची आवश्यकता असल्यास, सरकार तो तत्काळ उपलब्ध करुन देईल.

झारखंड राज्यात हलक्या पावसाची शक्यता

मिचॉंग चक्रीवादळाचा झारखंड राज्यातही प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. राज्यात 7 डिसेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असे वृत्त वृत्तसंस्था पीटीआने दिले आहे.

ओडिशा राज्यात बचाव पथके तैनात

चक्रीवादळाचा प्रभाव पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशा राज्य सरकारने दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये बचाव पथके पाठवली आहेत. IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे की, या चक्रीवादळाचा ओडिशावर फारसा परिणाम होण्याची अपेक्षा नसली तरी राज्यात सोमवारी रात्री हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.