कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गामुळे जगभरात सायबर हल्ल्यांचे (Cyber Attack) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता भारतात रशियन कोरोना व्हायरस लसीची ट्रायल करणाऱ्या डॉ. रेड्डी या फार्मा कंपनीवर (Dr Reddy's Laboratories) सायबर हल्ला झाला आहे. यानंतर कंपनीने आपल्या सर्व कारखान्यांचे काम बंद केले आहे. सायबर हल्ल्याबरोबर सर्व्हर डेटाही बाहेरील लोकांपर्यंत पोहोचला असावा असा कंपनीचा संशय आहे. मात्र कंपनीचे म्हणणे आहे की कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही आणि येत्या 24 तासांत काम पुन्हा सुरू होईल.
सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरलकडून डॉ. रेड्डी यांना कोविड-19 साठी रशियन लस, स्पुतनिक व्हीची (Sputnik V) दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील ट्रायल करण्याची परवानगी मिळाली आहे. रशिया हा पहिला असा देश आहे ज्याने कोरोना विषाणूची लस विकसित केल्याचा दावा केला आहे. आता या सायबर हल्ल्यानंतर, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश राठी म्हणाले. ‘सायबर हल्ला झाल्याचे समजताच आम्ही आवश्यक बचाव कार्य म्हणून सर्व डेटा सेंटर आयसोलेट केले आहेत. आम्हाला आशा आहे की पुढील 24 तासांमध्ये सर्व सेवा सुरू होतील. या घटनेमुळे कामावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.’
डॉ. रेड्डीजचे अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, रशिया आणि भारत येथे ड्रग प्लांट आहेत. या सायबर हल्ल्याची बातमी मिळताच डॉ. रेड्डीचे शेअर्स जवळपास 4 टक्क्यांनी घसरले आहेत. ज्यानंतर आता कंपनीच्या शेअर्सची किंमत 4832 झाली आहे. पूर्वी हीच किंमत 4985 रुपये होती. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा सायबर हल्ला झाला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
दरम्यान, मागील महिन्याच्या सप्टेंबरमध्ये, डॉ. रेड्डीज आणि आरडीआयएफने स्पुतनिक व्ही लसची क्लिनिकल चाचणी आणि त्यास भारतात वितरण करण्यासाठी भागीदारी झाली. भागीदारीचा एक भाग म्हणून, आरडीआयएफ नियामक मान्यतेनंतर डॉ. रेड्डीजची लसची 10 कोटी डोस भारतात पुरवेल.