Republic Day 2021 Parade मध्ये पाहायला मिळणार कोविड-19 लसीच्या निर्मितीची झलक
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

प्रजासत्ताक दिन (Republic Day) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजे 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये कोविड-19 वरील लस निर्मितीचे दर्शन घडणार आहे. भारताकडे कोरोनावरील दोन लसी आहेत.- कोवॅक्सिन (COVAXIN) आणि कोविशिल्ड (Covishield). दरम्यान, गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. देशात आतापर्यंत 1,06,25,428 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1,53,032 लोकांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मात्र आता लस मिळाली असून 16 जानेवारीपासून  देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

कोविड-19 संकटावर मात करण्यासाठी भारतीय कसे एकत्र आला आणि प्रत्येक पाऊलावर कशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टी आत्मसाद केल्या याची झलक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत बायोटेक्नॉलॉजी विभागाद्वारे दाखवण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियान ही यंदाच्या Tableau ची थीम आहे.

Tableau मध्ये लसीच्या निर्मितीचे वेगवेगळे टप्पे दाखवण्यात येतील. रथात खूप शास्त्रज्ञांची खूप मोठी प्रतिमा कोविड लसीसोबत दाखवण्यात येणार आहे. यातून मानवजातीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने मिळालेले ऐतिहासिक यश लोकांना पाहता येईल. (Tableau of Maharashtra 2021: प्रजासत्ताक दिनी यंदा संत परंपरेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची इथे पहा झलक, Watch Video)

यासाठी ट्रॅक्टरचे 5 भागांत वर्गीकरण करण्यात येईल. Electron Microscope, अलगीकरण आणि त्याची वैशिष्टे दाखवण्यात येतील. दुसऱ्या केबिनमध्ये cell separator, cell grower आणि virus storage system दाखवण्यात येईल. तिसऱ्या केबिनमध्ये रिसर्च लॅब तर चौथ्या केबिनमध्ये लसीची निर्मिती पाहायला मिळेल. पाचव्या केबिनमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सची झलक दिसेल. केबिनबाहेर तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स पाहायला मिळतील, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसंच अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 लसीची निर्मिती, उपचारात्मक संसाधनांची स्थापना आणि सेवा ही पारंपारिक ज्ञानावर आधारित आहे.