Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: Getty Images)

भारताने 6 देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंगच्या 72 तास आधी कोविड आरटी-पीसीआर नकारात्मक अहवाल अपलोड करणे बंधनकारक असेल.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की चीन, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान येथून भारतामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी बोर्डिंगच्या 72 तास आधी आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे व ती नकारात्मक असले तरच भारतामध्ये प्रवास करण्याची मुभा असेल. हा नियम परिवहन प्रवाशांनाही लागू होईल. भारताने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा चीन महामारीच्या सुरुवातीपासून सर्वात वाईट कोविड उद्रेकाचा सामना करत आहे.

गेल्या महिन्यात, एका अहवालात म्हटले आहे की 20 डिसेंबरपर्यंत, चीनमधील सुमारे 20 टक्के लोकसंख्येला व्हायरसने ग्रासले होते. चीनमध्ये महामारीच्या काळात गर्दीने भरलेली रुग्णालये आणि शवागारांमध्ये मृतदेहांचे ढीग असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता भारताने चीन, दक्षिण कोरिया, जपान, थायलंड, हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांतील प्रवाशांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. आरटी-पीसीआर चाचणी ही विषाणूच्या चाचणीसाठी सर्वात विश्वासार्ह मानली जाते. (हेही वाचा: Coronavirus: भारतात कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या 2,706 वर, 265 नव्या रुग्णांची नोंद)

दरम्यान, भारतात कोविडच्या दैनंदिन रुग्णांची संख्या सध्या तरी कमी आहे. गेल्या महिन्यात, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवापूर्वी, केंद्राने राज्यांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याची आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याची आठवण करून दिली. वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या गरजेवरही केंद्र सरकारने भर दिला होता. देशातील कोविड परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उच्चस्तरीय बैठक घेतली होती.