Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

कोरोना विषाणूबाबतची (Coronavirus) देशी लस 'कोव्हॅक्सिन'ने (Covaxin) चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात सकारात्मक आशा निर्माण केल्या आहेत. हैद्राबादस्थ‍ित कंपनी भारत बायोटेक (Bharat Biotech) 'कोव्हॅक्सिन' लस विकसित करीत आहे. कंपनीने सांगितले की पहिल्या लसीकरणानंतर या लसीशी संबंधित कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून आला नाही. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीचा निकाल जाहीर करताना कंपनीने बुधवारी संध्याकाळी हे सांगितले. कोव्हॅक्सिनने प्रारंभिक टप्प्यातील चाचण्यांमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती दर्शविली आहे. या लसीच्या चाचण्यांमध्ये स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत.

भारत बायोटेकच्या या लसीच्या क्लिनिकल चाचणीचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्येच संपला होता, ज्याचे निकाल आता जाहीर केले आहेत. कंपनीने सांगितले की, 'या लसीमुळे न्यूट्रलायजिंग अँटीबॉडीला चालना मिळाली आहे आणि सर्व प्रकारच्या डोस ग्रुपकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहेत व या लसीशी संबंधित कोणताही प्रतिकूल दिसून आला नाही.’ कंपनीने म्हटले आहे की, ‘पहिल्या लसीकरणानंतर प्रतिकूल परिणाम सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा होता आणि कोणतीही औषधोपचार न करता तो वेगाने बारा झाला .सर्वात सामान्य प्रतिकूल परिणाम इंजेक्शनच्या जागी होता, तो स्वतः बरे झाला.’

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, आयसीएमआरच्या सहकार्याने भारत बायोटेकने या लसीमध्ये पॉवर बूस्टरची भर घातली आहे. मानवाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे पॉवर बूस्टर महत्त्वपूर्ण आहे. यामुळे लोक इतर लसांपेक्षा जास्त काळ कोरोना साथीच्या आजारापासून सुरक्षित राहू शकतील. या लसीने देशभरात मोठ्या आशा निर्माण केल्या आहेत. ‘कोव्हॅक्सिन'च्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यासाठी भारत बायोटेकने डिसेंबरमध्ये डीसीजीआयकडे अर्ज केला आहे. (हेही वाचा: आयसीएमआर म्हणतंय मुंबईच्या सांडपाण्यात कोरोना व्हायरस, चिंता पुन्हा वाढली)

कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इल्ला यांनी 10 डिसेंबर रोजी सांगितले की, कोव्हॅक्सिन पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरक्षितता आणि क्षमता यासंबंधी माहितीसह उपलब्ध होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.