उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे मुलीकडे प्रेगन्सी टेस्ट किट (Pregnancy Test Kit) मिळाल्याने पालकांनी आपल्या मुलीची हत्या केली आहे. एव्हढेच नाही तर त्यांनी मृतदेहाची ओळख पुसण्यासाठी मुलीच्या अंगावर अॅसिडही ओतले. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी 8 फेब्रुवारीला खुनाचा खुलासा केला आहे. पोलिसांनी पालकांसह इतरांना अटक केली आहे.
हे प्रकरण कौशांबीतील तेन शाह अलमाबाद गावचे आहे. येथे मुलीकडे गर्भधारणा चाचणी किट मिळाल्याने तिचे मुलांशी शारीरिक संबंध असल्याच्या संशयाने आई शोभा आणि वडील नरेश यांनी संतापाच्या भरात स्वत:च्या मुलीचा गळा दाबून खून केला आहे. (हेही वाचा: फेसबुकवरील प्रियकरासाठी पती व 4 वर्षाच्या मुलाची हत्या; मृतदेहांसमोर केला Sex, वाचा प्रेम, सेक्स आणि हत्येची संतापजनक कहाणी)
माहितीनुसार, नरेशने 3 फेब्रुवारी रोजी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर मंगळवारी मुलीचा मृतदेह गावाबाहेरील कालव्यात सापडला. मृतदेहाची ओळख पुसण्यासाठी आरोपींनी बॅटरी अॅसिडचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी बुधवारी सांगितले की, तपासादरम्यान आढळून आले की नरेश आणि त्याची पत्नी शोभा देवी यांनी 3 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरात त्यांच्या मुलीचा गळा दाबून खून केला होता.
त्यानंतर ओळख लपवण्यासाठी त्यांनी तिच्या शरीरावर बॅटरी अॅसिड ओतले. नरेशचे दोन भाऊ गुलाब आणि रमेश यांनी जोडप्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केली. नरेशने पोलिसांना सांगितले की, त्याची मुलगी अनेक मुलांशी मोबाईलवर बोलत असे. मुलीकडे जेव्हा गर्भधारणा चाचणी किट सापडले त्यामुळे नरेशला संशय आला की आपल्या मुलीचे मुलाशी शारीरिक संबंध आहेत. याच रागातून त्याने मुलीची हत्या केली. आता पोलिसांनी शोभा, नरेश व नरेशच्या दोन भावांना अटक केली आहे.