Radhakishan Damani (संग्रहित संपादित प्रतिमा)

डी'मार्टचे (D Mart) संस्थापक राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani) त्यांचे कुटुंब आणि सहकारी यांनी मुंबईत (Mumbai) सुमारे 28 गृहनिर्माण युनिट्सची मालमत्ता सुमारे 1,238 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. मनीकंट्रोलने आपल्या एका बातमीत याबाबत माहिती दिली आहे. देशातील सर्वात मोठा मालमत्ता करार म्हणून याकडे पाहिले जात आहे. अर्थमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात अशा काही घोषणा केली आहे, ज्याचा परिणाम देशातील लक्झरी प्रॉपर्टीच्या विक्रीवर होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी डीलची माहिती समोर आली आहे.

अर्थमंत्र्यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्पीय भाषणात, दीर्घ मुदतीच्या मालमत्तेच्या विक्रीवरील भांडवली नफ्यावर 10 कोटी रुपयांची मर्यादा असल्याची घोषणा केली होती. यामध्ये घरांच्या मालमत्तेचाही समावेश आहे. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून होणार आहे. सध्या अशी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. या मालमत्ता राधाकिशन दमाणी यांच्या कंपनीच्या नावावरही घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे.

देशातील सर्वात मोठ्या रिटेलर्स पैकी एक असलेल्या राधाकिशन दमाणी यांनी खरेदी केलेल्या या मालमत्तेचा एकूण कार्पेट एरिया सुमारे 1,82,084 चौरस फूट आहे. त्यात 101 कारसाठी पार्किंगची जागा देखील समाविष्ट आहे. या मालमत्तेची नोंदणी 3 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आली आहे. ही मालमत्ता मुंबईच्या वरळी भागातील अॅनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बी मध्ये आहे. या मालमत्तेची विक्री बिल्डर सुधाकर शेट्टी यांच्याद्वारे घडली आहे. शेट्टी यांनी रिअल इस्टेट डेव्हलपर विकास ओबेरॉय यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हा विकसित केला आहे.

या टॉवरमधील बहुतेक अपार्टमेंट्स सुमारे 5,000 स्क्वेअर फूट आहेत, ज्याची किंमत सुमारे 40-50 कोटी रुपये आहे. सुधाकर शेट्टी यांच्या स्कायलार्क बिल्डकॉन या कंपनीने भागीदारीत हा प्रकल्प तयार केला आहे. डीएचएफएलकडून सुमारे 1,000 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन कंपनीने 2019 मध्ये या प्रकल्पासाठी तयारी केली आहे. या कर्जाची मुदत 72 महिने आहे आणि ती 14.22% व्याजाने दिली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओबेरॉय 360 वेस्टचे काही युनिट्स या कर्जासाठी तारण म्हणून ठेवण्यात आले होते. (हेही वाचा: पंतप्रधान मोदी अदानींवर चर्चा न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, राहुल गांधींची टीका)

ओबेरॉय रिअल्टीच्या वरळीतील थ्री सिक्स्टी वेस्ट प्रकल्पात 4BHK आणि 5BHK युनिट्स आहेत. याचे दोन टॉवर आहेत, त्यापैकी एक टॉवर रिट्झ-कार्लटन हॉटेलचा आहे आणि दुसरा टॉवर लक्झरी निवासींसाठी आहे, ज्याचे व्यवस्थापन जागतिक हॉस्पिटॅलिटी चेनद्वारे केले जाते. या से फेसिंग प्रकल्पाची उंची 360 मीटर असून, त्याचे सर्व अपार्टमेंट्स पश्चिमेकडे असल्यामुळे त्याला थ्री सिक्स्टी वेस्ट हे नाव देण्यात आले आहे.