प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

भारतामधील भ्रष्टाचार (Corruption In India) कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. सरकारने देशातील भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावाही केला, परंतु चित्र अद्याप आहे तसेच दिसत आहे. ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्स (Global Corruption Perception Index) 2019 मध्ये भरताचे स्थान घसरले आहे. जगातील भ्रष्टाचार कमी असलेल्या देशांच्या यादीत चीनबरोबर संयुक्तपणे भारत, 80 व्या स्थानावर आहे.

दरवर्षी ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनल अनेक देशांमधील भ्रष्टाचाराच्या स्थितीबद्दल रँकिंग जारी करते. यावेळी देखील संस्थेने 180 देशांची यादी प्रसिद्ध केली, ज्य्यामध्ये भारताला 80 वे स्थान मिळाले आहे.

विशेष म्हणजे 80 व्या क्रमांकावर भारत-चीन व्यतिरिक्त बेनिन, घाना आणि मोरोक्कोसारखे देश एकत्रितपणे आहेत. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांमध्ये डेन्मार्क अव्वल आहे. त्याच्यासह न्यूझीलंड संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर फिनलँड, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि नॉर्वेचा क्रमांक लागतो. 2018 मध्ये भारताला 78 वे स्थान मिळाले होते. शेजारील पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचारावर किती नियंत्रण ठेवले गेले आहे, ते फक्त त्याच्या स्थानावरून लक्षात येते. 180 देशांमध्ये पाकिस्तानची रँकिंग 120 आहे आणि स्कोअर केवळ 32 आहे. (हेही वाचा: भ्रष्टाचार हटवण्यासाठी मोदी सरकारचा सक्तीची निवृत्ती पॅटर्न कायम, 15 भ्रष्ट अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता)

जागतिक क्रमवारीत सोमालिया 180 व्या स्थानावर आहे. त्याआधी दक्षिण सुदान, सिरिया, येमेन, व्हेनेझुएला आणि सुदान असे देश आहेत. शेजारच्या देशांबद्दल बोलयाचे झाले तर, भूतान हा एकमेव असा देश आहे जेथे भ्रष्टाचार कमी आहे. भूतान 68 गुणांसह 25 व्या स्थानावर आहे. इतर देशांमध्ये ही परिस्थिती भारतापेक्षा वाईट आहे. श्रीलंकेचा 93 वा क्रमांक, नेपाळ 113 व्या, मालदीव-म्यानमारचा 130 वा आणि बांगलादेशचा 146 वा क्रमांक आहे.