Medical workers (Photo Credits: IANS)

देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) स्थिती पूर्वीसारखीच आहे. नुकतेच कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसले होते, परंतु पुन्हा गुरुवारी 86,000 पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदवली गेली. अहवालानुसार सप्टेंबर (September) महिना कोविड-19 साथीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या भारतासाठी खूप वाईट ठरल्याचे दिसून आले आहे. या महिन्यात फार जास्त प्रमाणावर कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि मृत्यूची संख्याही मोठी आहे. देशातील एकूण प्रकरणांपैकी 41 टक्के संक्रमण सप्टेंबर महिन्यात नोंदवले गेले आहे, तर एकूण मृत्युपैकी 34 टक्के मृत्यू सप्टेंबरमध्ये झाले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

देशात आतापर्यंत  63 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत, अशा कोविड-19 घटनांपैकी सप्टेंबरमध्ये 26,21,418 म्हणजेच 41.53 टक्के नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात या आजारामुळे 33,390 रुग्ण मृत्यूमुखी पडले होते, जे आतापर्यंत झालेल्या 98,678 मृत्यूंच्या 33.84 टक्के आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये हे दिसून आले आहे की, देशात आतापर्यंत बरे झालेल्या एकूण 52,73,201 रुग्णांपैकी, 24,33,319 लोक बरे झाले आहेत. हे प्रमाण 46.15 टक्के आहे. ऑगस्टमध्ये 28,859 मृत्यूची नोंद झाली. जुलैमध्ये 19,122 मृत्यू,  जून आणि मेमध्ये अनुक्रमे 11,988 आणि 4,267 मृत्यूंची नोंद झाली आहे.

सध्या लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे, परंतु लॉक डाऊनमुळे गेले अनेक महिने काम बंद असल्याने आता पीडित लोक कामावर जाऊ लागले आहेत. त्याचबरोबर बड्या कार्यालयांमध्येही वर्क फ्रॉम होमचे धोरण संपुष्टात आणले जात असून, कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयाला बोलावण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बर्‍याच ठिकाणी सुरक्षित वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे हा आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. (हेही वाचा: घर घेताय? कोरोनाने लावलाय गृह खरेदी विक्री व्यवहारांना ब्रेक; दिल्ली, पुणे, कोलकातासह प्रमुख शहरांत मागणी घटली)

दरम्यान, भारतामध्ये कोविड-19 ने 7 ऑगस्टला 20 लाखांचा टप्पा ओलांडला, 23 ऑगस्टला 30 लाख आणि 5 सप्टेंबरला 40 लाखांचा टप्पा ओलांडला. ही रुग्णसंख्या 16 सप्टेंबरला 50 लाखांवर गेली आणि 28 सप्टेंबरला 60 लाखांच्या पुढे गेली. देशात सध्या कोरोनाची 9 लाख 40 हजार 705 सक्रिय प्रकरणे आहेत.