Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये आज (30 एप्रिल) च्या सकाळी कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा 33050 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान यापैकी 8324 रूग्णांनी या आजारावर मात केली असून कोव्हिड 19 या जगभर धुमाकूळ घालणार्‍या आजाराने भारतामध्ये 1074 जणांचे प्राण गेले आहेत. मागील 24 तासामध्ये 1718 नव्या रूग्णांची भर पडली आहे तर 67 जणांचा बळी गेला आहे. झपाट्याने पसरत असलेल्या कोव्हिड 19 या आजाराला रोखण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान इतर विकसित देशाच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यास आपल्याला बर्‍यापैकी यश आल्याचा दावादेखील आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्यात असून येथील रूग्णसंख्या दहा हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी भारतामध्ये 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान सध्या हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत लागू असणार आहे. त्यानंतर भारत सरकार लॉक डाऊन उठवण्यासाठी नेमके कोणते निर्णय घेणार? याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे काल संध्याकाळी देशात विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटक, मजूर, विद्यार्थ्यांच्या स्थलांतरासाठी केंद्राने हिरवा झेंडा दाखवला आहे.

ANI Tweet

भारतामध्ये गोवा सोबतच ईशान्य भारतामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यास भारताला यश आलं आहे. अंदमान निकोबार सारख्या केंद्र शासित प्रदेशामध्येही मागील 4 दिवसांपासून नवा रूग्ण आढळला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.  महाराष्ट्र राज्यात काल रात्रीपर्यंत 32 मृत्यू आणि 597 नवीन कोरोना व्हायरस बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण कोरोना विषाणू ग्रस्तांचा आकडा 9915 झाला आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांनी याबाबत माहिती दिली.