भारतामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्ण संख्येने 9 लाखाचा आकडा पार केला आहे. एकीकडे ही संख्या वाढत आहे, मात्र दुसरीकडे भारताचा रिकव्हरी रेटही वाढल्याचा दिसून येत आहे. या महामारीच्या काळात देशातील डॉक्टर्सनी फार महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र या लढाईमध्ये देशातील 93 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) म्हटले आहे की, देशातील कोरोना व्हायरसवर ड्युटीवर असताना 93 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. आयएमएचे प्रमुख डॉ. राजन शर्मा (Dr. Rajan Sharma) म्हणाले की, ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 1,279 डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
यामध्ये 35 वर्षांखालील 771 डॉक्टर, 35 वर्षांपेक्षा जास्त 247 डॉक्टर, 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 261 डॉक्टरांना हा संसर्ग झाला आहे. राजन शर्मा यांनी, या आकडेवारीत परिचारिका व इतर सहाय्यक कर्मचार्यांचा समावेश नसल्याचे सांगितले. आयएमए चीफ म्हणाले, 'या मृत्यूंशी संबंधित एक शोधनिबंध तयार केला जात आहे. आम्ही यामध्ये किती प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स मरण पावले आहेत आणि किती निवासी श्रेणीतील डॉक्टरांचा सहभाग आहे याचा शोध घेत आहोत. आयएमए लवकरच हा डेटा रीलिझ करेल.' डॉ. शर्मा यांनी पुष्टी केली की, ही आकडेवारी 'केरळमधील आयएमएच्या कोची शाखेचे अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीच्या विरोधात आहे. (हेही वाचा: मुंबईमध्ये आज 969 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 94,863 वर)
जयदेवनदेखील डेटा गोळा करत आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 110 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचा दावा डॉ. जयदेवन यांनी केला आहे. ते नर्स आणि इतर संबंधित आरोग्यसेवा कर्मचार्यांचा डेटा गोळा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. जयदेवन म्हणाले, 'त्यांनी गोळा केलेला डेटा हे त्यांचे वैयक्तिक काम आहे आणि ते आयएमएचे प्रतिनिधित्व करीत नाही.'
डॉक्टरांच्या मृत्यूच्या घटना सर्वाधिक, 23 टक्के या महाराष्ट्रामध्ये असून, त्यानंतर तामिळनाडू (16 टक्के), गुजरात (11 टक्के), दिल्ली (11 टक्के) आणि उत्तर प्रदेश (9 टक्के) यांचा नंबर लागतो.