देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरु असताना अजून एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कोविड-19 मुळे लोक म्यूकोरमाइकोसिस (Mucormycosis) ला बळी पडत आहेत. कोरोनामुक्त झालेले लोक म्यूकोरमाइकोसिस सारख्या भयंकर आजाराच्या विळख्यात अडकत आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली मध्ये याचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या लोकांना म्यूकोरमाइकोसिस संसर्ग अधिक होत आहे, असे महाराष्ट्र आणि गुजरातच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे डोळ्यांची दृष्टी जात असून इतर अन्य समस्या देखील उत्पन्न होत आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत म्यूकोरमाइकोसिस मुळे 8 जणांचा एक डोळा काढावा लागला आहे.. या लोकांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना म्यूकोरमाइकोसिसने घेरले होते. सध्या राज्यात कमीत कमी 200 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, "महाराष्ट्रात म्यूकोरामायसिसचे प्रकार वाढत आहेत. राज्यातील विविध भागात आतापर्यंत उपचार घेत असलेल्या अशा 200 पैकी आठ रुग्णांचा एक डोळा काढावा लागला आहे. हे लोक कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले होते. परंतु या काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे त्यांच्या कमजोर रोगप्रतिकारक क्षमतेवर हल्ला केला आणि जो प्राणघातक ठरला."
सूरत मधील किरण सुपर मल्टी-स्पेशलिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष माथुर सवानी यांनी सांगितले की, तीन आठवड्यापूर्वी कोरोनातून बरे झालेल्या एका रुग्णात म्यूकोरामायसिस चे निदान झाले. सध्या म्यूकोरामायसिसने पीडित 50 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 60 रुग्ण अजूनही उपचाराच्या प्रतिक्षेत आहेत.
एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले की, अहमदाबादमध्ये दररोज असवरवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कमीतकमी पाच म्यूकोरामायसिसच्या रुग्णांची शस्त्रक्रिया केली जाते. रूग्णालयाच्या ईएनटी तज्ज्ञ डॉ. देवानंग गुप्ता म्हणाले, "कोविड-19 ची दुसरी लहर सुरू झाल्यानंतर आपल्याकडे दररोज 5 ते 10 अशा प्रकारची प्रकरणे आढळून येत आहेत."