Rahul Gandhi | (Photo Credit: ANI)

राहुल गांधींना (Rahul Gandhi) लोकसभेतून (Loksabha) अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे (Congress Party) रविवारी सर्व राज्ये आणि जिल्हा मुख्यालयातील गांधी पुतळ्यांसमोर दिवसभराचा 'सत्याग्रह' आंदोलन केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता सत्याग्रह आंदोलन सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजता संपेल. 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निषेध करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी केलेल्या "सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे" या टिप्पणीसाठी त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी या राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील राजघाटावर सत्याग्रह करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शनिवारी सांगितले की, पक्षाचे कार्यकर्ते सर्व राज्य मुख्यालयात आणि गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह करतील.

दरम्यान काल झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, माझ्यावर केली जाणारी कारवाई हे एक नाटक आहे. मी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात नेमके नाते काय आहे? हे नाते अलीकडील काळातील नाही. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून ते मोदी पंतप्रधान असे पर्यंत आणि वर्तमान काळातही सुरु आहेत. गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये गुंतवले गेलेले 20,000 कोटी रुपये कोणाचे होते, असा सवाल आपण विचारल्यामुळेच कारवाईचे नाटक रचले जात असल्याचा वार राहुल गांधी यांनी केला आहे.