Priyanka Gandhi | File Image | (Photo Credits: IANS)

व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरणी केंद्रामध्ये मोदी सरकारला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. या प्रकरणी कॉंग्रेसने सरकार हल्ला चढवला आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी सरकारवर मोठा आरोप केला आहे. सुरजेवाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘सरकारने कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) यांचा फोनही हॅक करविला होता. यासोबतच प्रियंका गांधींना व्हॉट्सअॅप हॅकिंगचा संदेशही मिळाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे’. यासोबत त्यांनी भाजप एजन्सी ज्या प्रकारे बेकायदेशीररित्या पाळत ठेवत आहे त्याबाबतही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

एव्हढेच बोलून कॉंग्रेस प्रवक्ते थांबले नाहीत, तर ते पुढे असेही म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे फोन हॅक झाले आहेत. भाजपा सरकार आणि त्याच्या एजन्सींनी इस्रायली एनएसओचे सॉफ्टवेअर वापरून नेते, संपादक, कार्यकर्ते व पत्रकारांचे फोन हॅक केले आहेत. यामध्ये पुढे अनेक विरोधी पक्ष नेते आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा फोनदेखील सामील होऊ शकतो असा दावा सुरजेवाला यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर केंद्र सरकारच्या वतीने असेही म्हटले गेले आहे की, हा सर्व भारत सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत बोलताना व्हॉट्सअॅपने सांगितले आहे की, त्यांच्याकडून हॅकिंगसंदर्भात केंद्र सरकारला इशारा देण्यात आला होता. मात्र यावर हा इशारा तांत्रिक होता, तो आम्हाला समजला नाही असे स्पष्टीकरण सरकारी सूत्रांनी दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरुन तब्बल 1400 भारतीयांचा फोन हॅक झाल्याच्या बातमी नंतर हा गदारोळ मजला आहे.