Child Marriage: बालविवाहासंबंधी 4000 हून अधिक गुन्हे, 1800 लोकांना अटक; 'या' राज्य पोलिसांची मोठी कारवाई
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा बालविवाहावर (Child Marriage) बंदी घालण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री हिमंता म्हणाले की, राज्यभरात एकूण चार हजारांहून अधिक बालविवाहाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. बाल विवाहाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई सुरु आहे. आसाम पोलिसांनी राज्यभरात बालविवाहाशी संबंधित प्रकरणांमध्ये आतापर्यंत 1,800 जणांना अटक केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी येथे पत्रकारांना ही माहिती दिली.

आसाम सरकारने शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून बालविवाहाविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान, गुन्हेगारांना अटक करून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्यांविरुद्ध प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी यापूर्वी सांगितले होते की, अशा विवाहांमध्ये सहभागी असलेल्या पुजारी, काझी आणि कुटुंबातील सदस्यांवरही गुन्हा दाखल केला जाईल. आतापर्यंत धुबरी येथे सर्वाधिक 136 अटक करण्यात आली असून त्यात सर्वाधिक 370 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

14-18 वयोगटातील मुलींशी विवाह करणाऱ्यांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. अशा लोकांना अटक करून त्यांचे लग्न अवैध ठरवले जाईल. जर मुलाचे वय 14 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याला सुधारगृहात पाठवले जाईल. (हेही वाचा: Bangalore Shocker: तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक)

तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की आसाम सरकार राज्यातील बालविवाह बंद करण्याच्या आपल्या संकल्पावर ठाम आहे. आसाम पोलिसांनी आतापर्यंत राज्यभरात बालविवाहाचे 4000 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. येत्या काही दिवसांत पोलीस आणखी कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. राज्य मंत्रिमंडळाने 23 जानेवारी रोजी निर्णय घेतला होता की, बालविवाहाच्या दोषींना अटक केली जाईल आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम देखील सुरू केली जाईल.