भारतात दररोज महिला आणि मुलींवर बलात्काराच्या (Rape) घटना समोर येत आहेत. देशात कडक कायदे असूनही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. आता ताजे प्रकरण चेन्नईतून (Chennai) समोर आले आहे. येथे एका नराधमाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही 43 वर्षीय महिला सरकारी कार्यालयात अस्थायी कर्मचारी सदस्य म्हणून काम करत आहे. महिलेवर तिच्या राहत्या घरी 20 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ही महिला काम संपवून घरी परतली तेव्हा तिच्या घराच्या गेटबाहेर एक माणूस उभा होता. महिलेने तिच्या घराचा दरवाजा उघडला त्याचवेळी या तरुणाने तिला आत ढकलले. त्यानंतर नराधमाने महिलेचे तोंड बंद केले आणि चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. विशाल असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे वय सुमारे 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीडितेने सांगितले की, विशालने तिचे नग्न फोटोही काढले आणि तिचा फोन नंबरही घेतला. यानंतर विशालने रात्री महिलेला फोन करून मी तुला जेव्हा बोलावेन तेव्हा तुला यावे लागेल, नाहीतर तुझे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली. यानंतर पीडितेने आपल्या मोठ्या मुलीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात विशालविरुद्ध तक्रार केली. (हेही वाचा: Rape: धक्कादायक ! जन्मदात्या पित्याचा 6 वर्षीय मुलीवर बलात्कार)
तक्रारीच्या आधारे ‘ऑल वूमन पोलीस’ यांनी आरोपीचा नंबर ट्रेस करून त्याला अटक केली. आरोपीने अनेक दिवसांपासून महिलेचा पाठलाग केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, महिला एकटीच राहते असे त्याला समजल्यानंतर त्याने हे कृत्य केले. आरोपीने महिलेचा नंबर मिळवण्यासाठी तिच्या फोनवरून स्वतःला कॉल केला होता, त्यामुळे पोलिसांना आरोपीना त्वरीत पकडण्यात यश आले. पोलिसांनी शनिवारी विशालला अटक करून त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 294 (बी), 451, 376, 354 (सी) आणि 501 (आय) अन्वये गुन्हा दाखल केला.