कोरोनामुळे (Coronavirus) बाहेरच्या देशातून भारतात आलेल्या सर्व नागरिकांना Home Qurantine म्हणजेच काही काळासाठी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या सूचनेला गांभीर्याने न घेता दर दिवशी कोणी ना कोणी घरातून बाहेर पडले, पळून गेले असे वृत्त समोर येत असते. असाच काहीसा प्रकार चेन्नई मध्ये सुद्धा घडला आहे, मात्र यामध्ये या क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीने केलेला प्रताप विश्वासही बसणार नाही इतका गंभीर आहे. श्रीलंकेतून (Srilanka) परतलेला हा 34 वर्षीय इसम मागील काही दिवसांपासून घरातच देखरेखीखाली होता मात्र शुक्रवारी रात्री त्याने सर्वांची नजर चुकवत आपल्याच घरातून पळ काढला, यावेळी त्याने चक्क नग्न अवतारातच पळ काढल्याचे समजत आहे. इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या घराच्या बाहेर झोपलेल्या एका 90 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्याला जोरदार चावा घेतला असेही समजत आहे. दुर्दैवाने या महिलेचा पुढे उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित इसमाच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे कुटुंब आणि शेजाऱ्यांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे. तो आपल्या कपड्याच्या व्यवसायासाठी श्रीलंकेत असतो, मात्र काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या भीतीने तो मूळ गावी परतला होता. तक्वारंटाईन करण्यात आले असताना त्याची मानसिक परिस्थिती बिघडत गेली आणि त्याने शुक्रवारी रात्री घरातून पळ काढला, यावेळी घराच्या बाहेर झोपलेल्या 90 वर्षीय वृद्ध महिला तो चावला, हा प्रकार घडताच महिलेने आरडाओरडा केला आणि त्यामुळे शेजाऱ्यांना जाग आली आणि हा व्यक्ती पळून जात असल्याचे समजले.
दरम्यान, याबाबत स्थानिकांनी लगेचच पोलिसांना कळवले आणि संबंधित व्यक्तीला रोखून ठेवले, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माथेफिरुला ताब्यात घेतले, तर यावेळात शेजाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेले, दुर्दैवाने तिचा याठिकाणी उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.