CAA Protest:  नोर्थ ईस्ट दिल्ली मध्ये कलम 144 लागू; पुढील महिन्याभरासाठी जमावबंदी लागू
दिल्ली हिंसाचार । Photo Credits: Twitter

नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये मागील 24 तासांपासून सुरू असलेला हिंसाचार अजूनही उफाळत आहे. CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक ठिकाणी दगडफेक आणि गोळीबार झाला आहे. दरम्यान या हिंसक घडामोडीनंतर दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी पुढील महिन्याभरासाठी दिल्ली शहरामध्ये लागू करण्यात आली आहे. काल दगडफेक आणि गोळीबारामध्ये एका दिल्ली पोलिसासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय नागरिकत्व कायद्याच्या समर्थन आणि विरोधात आंदोलनं सुरू असून तुफान दगडफेक आणि दिवसाढवळ्या गोळीबार देखील झाला. दिल्ली हिंसाचार: 8 राऊंड फायरिंग करणारा तरूण 'शाहरूख' पोलिसांच्या अटकेत.  

काल रात्री काही काळ दिल्लीमधील स्थिती नियंत्रणामध्ये आली होती मात्र आता पुन्हा काही गटांमध्ये दगडफेक सुरू झाल्याने आता नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. करवाल नगर परिसरामध्ये ट्राफिकसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत.

कालपासून दिल्लीमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक लोकं जखमी झाले आहेत. दिल्लीमध्ये जाळपोळीदरम्यान पेट्रोलबंब देखील पेटवण्यात आले आहेत. तर जाळपोळ रोखण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीवरदेखील जमावाने दगडफेक केली आहे.