नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या हिंसाचार प्रकरणी, उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) आतापर्यंत 1741 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) मध्ये भडक भाषण देणारे डॉ. कफील यांना तीन दिवस ट्रांझिट रिमांडवर, एसटीएफह लखनऊला घेऊन येत आहेत. डॉ. कफील यांना तिथून अलीगड येथे नेण्यात येईल. सीएएविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात लखनऊ, अलीगड, कानपूर नगर, मेरठ यासह 26 जिल्ह्यांमध्ये 434 गुन्हे दाखल झाले आहेत. मेरठ विभागात सर्वाधिक 93 आणि आग्रा झोनमध्ये 81 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
पोलिस अजूनही मोठ्या शर्थीने आणखी आरोपींचा शोध घेत आहेत. हिंसाचारानंतर इतर राज्यांमध्ये पळून गेलेल्या आरोपींविषयीही चौकशी सुरू आहे. अन्य तपास यंत्रणांच्या मदतीने उत्तर प्रदेश पोलिस सातत्याने कारवाई करत आहेत. एसटीएफचे एएसपी सत्यसेन यादव यांनी सांगितले की, डॉ. कफील यांना गुरुवारी दुपारी मुंबई कोर्टात हजर करण्यात आले.
दुसरीकडे डीआयजी कायदा व सुव्यवस्था विजय भूषण यांचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमाम याला पकडले आहे. अलीगढ आणि इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणाबाबत त्याची चौकशी केली जाऊ शकते. दिल्ली पोलिसांच्या कस्टडी रिमांड कालावधीनंतर हा निर्णय घेण्यात येईल. (हेही वाचा: नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनात हिंसाचार केल्याप्रकरणी यूपी मधील मृतांचा आकडा 15 वर पोहचला)
फिरोजाबादमध्ये सीएएविरोधात झालेल्या बंडखोरीतील नुकसानीची भरपाई करण्यासाठी, प्रशासनाने 26 आरोपींविरूद्ध वसुली प्रमाणपत्रे जारी केली आहेत. सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास आरोपींकडून सुमारे 45 लाख रुपये वसूल केले जातील. या बाबतीत पुनर्प्राप्ती न झाल्यास त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. सीएएच्या निषेधार्थ 20 डिसेंबर रोजी जुम्माच्या प्रार्थनेनंतर शहरात हिंसाचार आणि जाळपोळ सुरू झाली, ज्यात मालमत्तेच्या नुकसानासह 7 जणांचा मृत्यू झाला होता.