Anil Parab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ST Bus Employee Strike: राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे बसच्या सेवेवर मोठा परिणाम होत आहे. अद्यापही कामगारांकडून संप काही ठिकाणी सुरु आहे. त्यांच्या विविध मागण्यांपैकी पगार वाढीची मागणी पूर्ण झाली आहे. परंतु अद्याप विलिकरणाच्या मुद्द्यावरुन कामगार ठाम असल्याचे संप सुरुच ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  (Anil Parab) यांनी आता कर्मचाऱ्यांना येत्या सोमवार (13 डिसेंबर) पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मात्र कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एसटी बसच्या कर्मचाऱ्यांना 41 टक्क्यांनी पगार वाढ करुन दिला गेला आहे. परंतु पगार वाढ दिल्यानंतर सुद्धा कामावर रुजू न झालेल्या अशा 10 हजार जणांचे आतापर्यंत निलंबन करण्यात आल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कर्मचारी विलगिकरणाच्या मुद्द्यावर ठामच आहेत. एसटी कर्मचारी एकाच मुद्द्यावर ठाम असल्याने चर्चा होऊ शकली नाही असे अनिल परब यांनी म्हटले. त्याचसोबत विलगिकरणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाच्या समितीचा अहवाल आल्यानंतर कोर्टात त्याबद्दल निर्णय होईल. विलिकरणच्या मुद्द्यावर सरकार स्वतंत्र चर्चा करुन निर्णय घेऊ शकत नाही असे ही अनिल परब यांनी म्हटले आहे.(Mumbai: बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याच्या भीतीमुळे उडाळी खळबळ)

दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी निलंबन होईल त्या भीतीपोटी कामावर रुजू होत नाही आहेत. तसेच काहींनी आत्महत्या सुद्धा केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे प्रकार होऊ नयेत आणि निलंबन मागे घेतले जाईल यासाठी एक संधी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. परंतु त्यानंतर मात्र कर्मचारी कामावर रुजु झाले नाहीत तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अनिल परबांनी दिला आहे. महत्वाचे म्हणजे जवळजवळ 20 हजार कर्मचारी आतापर्यंत कामावर रुजु झाल्याने 127 डेपो मधील एसटी बसचे संचालन सुरु झाले आहे.