Dating App | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

बंबेल अॅपवरू (Bumble Dating App) डेटींग करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. हा व्यक्ती गुरुग्रम येथील असून त्याची बंबल अॅपवरुन एका महिलेशी ओळख झाली. त्यातून झालेल्या भेटीतून ती त्याच्या घरी आली आणि त्याला निद्राधीन करुन त्याचा महागडा आयफोन, घरातील सोन्याचे दागिणे आणि इतर रोख रक्कम घेऊन पसार झाली. पीडित इसमाने पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दिली आहे. रोहित गुप्ता असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. तो गुरुग्रामच्या DLF फेज 4 येथील रहिवासी आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारी आणि जबाबात सांगिले की, एका व्यक्तीने त्याचा महागडा मोबाइल फोन, सोन्याचे दागिने काढून घेतले आणि त्याच्या बँक खात्यातून 1.78 लाख रुपये काढून घेतले. त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.

रोहित गुप्ता याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो बंबल डेटींग अॅपच्या माध्यमातून साक्षी उर्फ पायल नावाच्या महिलेला भेटला. त्या महिलेने त्याला आपण दिल्लीची असल्याची माहिती दिली. तसेच, सध्या ती गुरुग्राम येथील तिच्या मावशीकडे राहात असल्याचेही तिने त्याला सांगितले. एक ऑक्टोबरच्या रविवारी तिने त्याला फोन केला आणि सांगितले की भेटायचे आहे. त्यानुसार रात्री 10.00 च्या सुमारास तिने त्याला सेक्टर 47 मधील डॉकयार्ड बारजवळ बोलावले. तो तिथे गेल्यावर त्याने तिला घेतले. येताना दारुच्या दुकानातून त्यांनी थोडी दारु विकत घेतली आणि दोघे मिळून त्याच्या घरी आले. दरम्यान, महिलेने मद्यसेवन करताना त्याला आणखी थोडा बर्फ आणण्यास सांगितले. तो आत गेला असता त्याने त्याच्या पेगमध्ये काही ड्रग्ज टाकले. ज्यामुळे तो थोड्याच वेळात निद्राधीन झाला. तो इतका गाढ झोपी गेला की थेट मंगळवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी सकाळी उठला.

झोपेतून उठल्यावर त्याला लक्षात आले की, महिला गायब आहे. ती केवळ गायबच नाही तर तिने त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, महागडा iPhone 14 Pro आणि घरातील रोख रक्कम , 10,000 रुपये आणि डेबिट कार्ड घेऊन धूम ठोकली आहे. तक्रारकर्त्या इसमाने दावा केला आहे की, महिलेने त्याच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डमधून 1.78 लाख रुपये देखील काढले आहेत.

दरम्यान, सध्या ही महिला फरार आहे. तिच्याविरोधात रोहित गुप्ता याने दिलेल्या तक्रारीवरुन सेक्टर 29 पोलीस ठाण्यात गुन्हा मंगळवारी (10 ऑक्टोबर) दाखल करण्यात आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले.