Australian Spouse Visa मिळवण्यासाठी बहीण भावाने बांधली लग्नगाठ, कारवाईच्या भीतीने दोघेही फरार
Australian Spouse visa |Image used for representational purpose | ( Photo Credits: Pixabay)

पंजाब (Punjab)  येथील एका बहीण - भावाच्या जोडीच्या डोक्यावर परदेशात स्थायिक होण्याचं भूत इतकं चढलं होतं की त्यासाठी या दोघांनी चक्क एकमेकांशी लग्न करून इमिग्रेशन ऑफिसला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियन स्पाऊज व्हिसा (Australian Spouse visa)  मिळवण्यासाठी या बहीण भावाच्या जोडीने हा प्रकार केल्याचं मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

पंजाबमधील एका तरूणीला ऑस्ट्रेलियन व्हिसा मिळवायचा होता. मात्र त्यासाठी आवश्यक पात्रता तिच्याजवळ नव्हती अशावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये स्थित तिच्या भावाने यामध्ये व्हिसा मिळवायला मदत करतो असं सांगून हा लग्नाचा प्लॅन रचला. या दोघांनी सारी कागदपत्र गोळा केली मात्र पासपर्ट आणि बॅंक अकाऊंटवर नाव बदलण्याचं राहून गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. सध्या याबाबत पोलिसतपास सुरू असून दोघेही फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी सामाजिक संस्था, न्यायसंस्था आणि धार्मिक संस्था या सार्‍यांनाच फसवलं आहे. केवळ त्यांना परदेशात स्थायिक होण्याच्या इच्छेपायी चूकीचा रस्स्ता निवडला. Australian Department of Home Affairs कडून त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. सार्‍या संशयित भागांमध्ये धाड टाकली जात आहे मात्र दोघेही अद्याप फरार आहेत.

लग्नाचा खोटा बनाव करून ऑस्ट्रेलिया व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न समोर आल्यानंतर 164 Spouse visa साठी करण्यात आलेले अर्ज रद्द केले गेले आहेत.