Prime Minister Narendra Modi. (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय सरकार येत्या काही दिवसांत आपले एक वर्ष पूर्ण करणार आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने (BJP) देशभरात 750 व्हर्चुअल मोर्चाचे आयोजन करण्याची योजना आखलेली आहे. तसेच राष्ट्रीय व राज्य नेतृत्व किमान 1000 आभासी परिषद घेतील, असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने पक्षाकडून मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिले वर्ष, 30 मे 2020 रोजी पूर्ण होणार आहे.

या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाबाबत राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ते लिहितात, ‘हे वर्ष अनेक ऐतिहासिक कामगिरींनी भरलेले होते. या वर्षात मोदी सरकारने तिहेरी तलक हटविण्याकरिता कायदा तयार करणे, कलम 370 हटविणे, लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनविणे, अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करून, निर्वासितांसाठी नागरी दुरुस्ती कायदा बनविणे, असे अनेक धडाडीचे निर्णय घेतले. आता कोविड-19 मुळे जगभरातील अनेक देश त्रस्त आहेत, अशात माननीय पंतप्रधानांनी वेळेत लॉकडाऊन जाहीर करण्यासह इतर प्रभावी पावले उचलली आहेत. गरीब कल्याणसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत सर्वसामान्य जनता, व्यापारी यांसाठी आर्थिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या योजनांसह 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.’

एएनआय ट्वीट -

मोदी सरकार-2 चे पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर, माननीय राष्ट्रीय अध्यक्षजींच्या निर्देशानुसार सद्य परिस्थिती लक्षात घेऊन, काही कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत-

माननीय पंतप्रधानांनी लिहिलेले पत्र, ज्यामध्ये आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे, तसेच कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आवाहन केले गेले आहे, हे पत्र देशभरातील 10 कोटी घरांपर्यंत पोहोचविले जाईल.

देशातील 150 मिडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली जाईल.

डिजिटल संपर्क- राष्ट्रीय अध्यक्षांचे फेसबुक लाइव्ह व त्याचा व्यापक प्रचार.

प्रत्येक बूथवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला जाईल. वरील माहिती त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संक्रमित सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश)

सरकारच्या कामगिरीशी संबंधित तसेच, कोविड-19 पासून वाचण्यासाठी सरकारचे प्रयत्न याचे लघु व्हिडिओ पक्षाकडून जाहीर केले जातील. यांचे स्थानिक भाषेत भाषांतर केले जाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अधिकाधिक प्रसारित केले जातील.

व्हर्चुअल संवाद - प्रत्येक मोठ्या प्रदेशात किमान 2 रॅली आणि लहान प्रदेशात किमान 1 रॅली, अशा  750 रॅलींचे आयोजन.

राष्ट्रीय आणि राज्य नेतृत्वद्वारे 1 हजार व्हर्चुअल परिषदेचे आयोजन, ज्या अंतर्गत 40 मिनिटांचे भाषण आणि 20 मिनिटांचे संवाद सत्र असेल.

सद्य परिस्थिती लक्षात घेऊन समाजातील सर्व घटक आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, सर्व कार्यकर्त्यांनी व पक्षाच्या सर्व घटकांनी डिजिटल तंत्रज्ञान व आभासी माध्यम अवलंबले पाहिजे. सामाजिक अंतराचे अनुसरण करून, मास्कचा वापर करून आणि आरोग्याशी संबंधित इतर काळजी घेऊन सर्व कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही या निवेदनात सांगितले आहे.

वरील कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि विभागीय स्तरावर संघांची स्थापना करावी आणि दररोजच्या कार्यक्रमांचा आढावा घ्यावा, कार्यक्रमांची पूर्तता करावी, असेही पक्षाने सांगितले आहे.