BJP National Executive Committee: भाजपने जाहीर केली राष्ट्रीय कार्यकारिणी; Narayan Rane यांना वगळले, जाणून घ्या महाराष्ट्रातून कोणत्या नेत्यांचा झाला समावेश
BJP (Photo Credits: BJP/Twitter)

भाजपने (BJP) गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारणी (National Executive Committee) जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नवीन संघाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ.मुरली मनोहर जोशी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, राज्यसभेतील सभागृह नेते, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि सर्व राष्ट्रीय अधिकारी यांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय कार्य समितीमध्ये 50 विशेष आमंत्रित आणि 179 कायमस्वरूपी आमंत्रित सदस्य असतील.

यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध विधानसभा आणि विधान परिषदेत विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय आघाडी अध्यक्ष, राज्य प्रभारी/ सह-प्रभारी प्रदेशाध्यक्ष सामील झाले आहेत. 7 नोव्हेंबर रोजी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली कार्यकारी बैठक असेल. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 सदस्यांची नावे घोषित केले आहेत.

महत्वाचे म्हणजे, भाजपच्या या यादीत वरूण गांधी आणि मेनका गांधी यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना स्थान मिळाले आहे. वरुण गांधी सातत्याने आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवत आहेत, यावरून ते पक्षाच्या विरोधात असल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये वरुण गांधी यांनी भाजपच्या एका मंत्र्याने लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना तुडवतानाचा व्हिडिओ शेअर केला असून, योगी सरकारकडून कारवाईची मागणी केली आहे. वरुण गांधींची बंडखोर वृत्ती लखीमपूर खेरी हिंसाचारापूर्वीही दिसून आली होती. (हेही वाचा: PM MITRA Scheme: वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन पीएम मित्र योजनेला मंजूरी, जाणून घ्या काय आहे ही योजना ?)

कार्यकारणीमध्ये समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये केंद्रीय मंत्री नाराणय राणे यानान स्थान देण्यात आले नाही. महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ, विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणीं, राष्ट्रीय प्रवक्ते, सुनील वर्मा, हिना गावित, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांचा समावेश आहे.