Loksabha Elections: काँग्रेस पक्षाला मत दिले म्हणून भाजपा पुढाऱ्याने चुलत भावावर चालवली बंदूक
Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

लोकसभा निवडणुकांचा (loksabha Elections 2019) शेवटचा टप्पा जसजसा जवळ येतोय तसा देशभरातील राजकीय पक्षांमध्ये तणाव वाढू लागलाय. याचा सर्वाधिक प्रभाव पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दिसून येतो. अशाच तणावात हरीयाणा (Hariyana) मधील भाजपाच्या (BJP) शाखा स्तरावरील पुढाऱ्याने आपल्या चुलत भावाने काँग्रेसला (Congress) मत दिल्याच्या रागात चक्क त्याच्यावर गोळ्या झाडल्याचे समजतेय. धर्मेंद्र सिलानी (Dharmendra Silani) या भाजपा पुढाऱ्याने आपल्या जवळील बेकायदेशीर बंदुकीने राजा सिंग (Raja Singh)  या आपल्या चुलत भावाच्या दोन्ही पायांवर व पोटात गोळ्या मारल्या. या घटनेनंतर राजा याला तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले व आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान पोलिसांनी सिलानी वर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे (Arms Act) व खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

TOI ने सादर केलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र सिलानी हे भाजपा पक्षाचे बहादुरगढ प्रदेशातील माजी नेतृत्व असून सध्या भाजपाच्या मंडळ स्तरावरील कार्यलयाचा कारभार सांभाळत आहेत. सिलानी याचा मोठा भाऊ हरेंद्र सिंग हा त्याच प्रदेशातील काँग्रेस पक्षाचा माजी नगरसेवक आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे सिलानी यांनी राजा सिंग व त्याच्या कुटुंबाला रविवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाला तर हरेंद्र याने काँग्रेस पक्षाला मत देण्यास सांगितले होते.  अमेठी: काँग्रेस पक्षाला मत देण्यासाठी महिलेवर दबाव, व्हिडिओ व्हायरल (Video)

राजा याने मत देताना हरेंद्रचा सल्ला ऐकून काँग्रेस पक्षातील उमेदवाराला मत दिले. मतदानानंतर रविवारी रात्री राजा आणि सिलानी यांच्यात बराच वेळ मत देण्याच्या विषयावर चर्चा झाली,त्यावेळी राजा ने काँग्रेसला मत दिल्याचे कळल्यावर संतापलेल्या सिलानी याने .315  बोर गन घेऊन राजाच्या घरी जाऊन त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या व त्यानंतर  तात्काळ तिथून काढता पाय घेतला. यावेळी राजाच्या पोटात मारलेल्या गोळीचा तुकडा राजाच्या आईला देखील लागल्याने ते दोघेही गंभीर जखमी झाले होते.

तूर्तास पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून फरार धर्मेंद्र सिलानी याचा तपास सुरु आहे असे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कुमार यांनी माध्यमांना सांगितले.