Bihar Bridge Collapses (संग्रहित संपादित प्रतिमा)

बिहारमधील (Bihar) बेगुसराय (Begusarai) येथून प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराची एक धक्कादायक बाब समोर येत आहे. येथील साहेबपूर कमल येथील बुढी गंडक नदीवरील पूल (Bridge) मध्यभागी तुटून पाण्यात बुडाला. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतके मोठे, तर हा पूल उद्घाटन होण्याआधीच तुटला आहे. या पुलाचे बांधकाम करण्यासाठी जवळजवळ 14 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुख्यमंत्री नवार्ड योजनेंतर्गत, अहोक कृती टोल नाका आणि विष्णुपूर दरम्यानच्या या 'उच्च-स्तरीय आरसीसी पुलाचे' बांधकाम 1343.32 लाख रुपये खर्चून फेब्रुवारी 2016 मध्ये सुरू झाले आणि ऑगस्ट 2017 मध्ये पूर्ण होणार होते.

या पुलाकडे जाणारा रस्ता अजूनही तयार न झाल्याने या पुलावर जास्त रहदारी नव्हती. तरीही ट्रॅक्टर त्यातून कसेबसे जात होते. आता हा पूल उद्घाटनाआधीच कोसळल्याने प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. याबाबत ग्रामीण बांधकाम विभागाच्या राज्य मुख्यालयातून प्रतिक्रिया मिळविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पाटणा येथील अभियंता प्रमुख एका पथकासह तपासासाठी रवाना झाल्याचे सांगितले. याबाबत दोषींवर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

उद्घाटनानंतर या पुलावर सामान्य वाहतूक सुरु झाली असती किंवा रविवारी दिवसा ही घटना घडली असती तर अनेकांना जीव गमवावा लागला असता. या पुलाला काही दिवसांपूर्वी तडा गेला होता मात्र त्यावर कोणतेही काम झाले नाही. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट बेगुसराय जिल्ह्यातील तेघरा येथील माँ भगवती कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. विष्णुपूर अहो पंचायतीचे प्रमुख सुबोध यादव यांनी सांगितले की, पुलाचे काम सुरू होताच कामातील अनियमितता पाहून त्यांनी याला विरोध केला होता मात्र त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. (हेही वाचा: बिहारमध्ये बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 77 वर; NHRC ने सरकारला बजावली नोरीस)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2 महिन्यांपासून या पुलाला भेगा पडू लागल्या होत्या, मात्र तरीही लोकांची ये-जा सुरूच राहिल्याने आज सकाळी अचानक हा पूल तुटून नदीत विलीन झाला. त्यावेळी पुलावर कोणतेही मोठे वाहन किंवा लोक उपस्थित नव्हते. 14 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल 14 महिनेही लोकांना सेवा देऊ शकला नाही. 2017 मध्ये हा पूल लोकांच्या वापरासाठी सुरु झाला होता मात्र त्याचे औपचारिक उद्घाटन अजून बाकी होते.