काय सांगता? BHU मध्ये विद्यार्थ्यांना दिले जात आहे 'शेणाच्या गोवऱ्या' बनवण्याचे प्रशिक्षण (See Photos)
'शेणाच्या गोवऱ्या' बनवण्याचे प्रशिक्षण (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन एक दिवस चांगली नोकरी करावी यासाठी पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च करतात. पण विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापक जर का त्यांना पुस्तकी ज्ञान सोडून शेणाच्या गोवऱ्या (Cow Dung Cakes) बनवायला शिकवत असतील तर? विश्वास बसत नाही ना? परंतु बनारस हिंदू विद्यापीठात (Banaras Hindu University) असेच एक प्रकरण समोर आले आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्यार्थी शेणाच्या गोवऱ्या बनवायला शिकून रोजगाराविषयी बोलत आहेत. विद्यापीठाच्याच एका विभागाने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांची टीकाही सुरू झाली आहे.

देशातील तरुणांची सर्वात मोठी चिंता ही बेरोजगारी आहे. बहुतांश तरुणांना रोजगार मिळत नसल्याबद्दल सरकारवर नेहमीच नेहमीच टीका केली जाते. कदाचित त्यामुळेच मोठमोठ्या विद्यापीठांतून शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी नोकरीच्या नावाखाली 'एमबीए चाय वाला', 'पकोडा वाला' असे व्यवसाय सुरु केले आहेत. आता पकोडा व्यवसायाच्या भरघोस यशानंतर कदाचित विद्यार्थी शेणाच्या गोवऱ्या विकण्याचा व्यवसाय सुरु करू शकतील.

बीएचयूच्या सामाजिक विज्ञान विद्याशाखेच्या प्रमुखाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विद्यार्थी शेणाच्या गोवऱ्या बनवताना दिसत आहेत. व्हिडिओ ट्विट करत त्यांनी लिहिले की, 'सामाजिक विज्ञान विद्याशाखेच्या एकात्मिक ग्रामीण विकास केंद्रात विद्यार्थ्यांना शेणाच्या गोवऱ्या बनवण्याच्या प्रशिक्षणाची कार्यशाळा पूर्ण झाली.' बीएचयूचे प्राध्यापक, ज्यांची विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती आणि जे सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे डीन आहेत, ते विद्यार्थ्यांना गोवऱ्या बनवण्याचे कौशल्य शिकवत आहेत शेणाचे महत्त्व समजावून सांगत आहेत. (हेही वाचा: मुलींना हिजाब घालून कॉलेजमध्ये जाता येणार, वेगळ्या वर्गात बसण्याची परवानगी)

विद्यार्थी म्हणतात ते गावात जाऊन लोकांना शेणाऱ्या गोवऱ्या बनवण्याचे प्रशिक्षण देतील. यामुळे आर्थिक फायदा होईल आणि रोजगारही उपलब्ध होईल. या व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यूजर्स याला पालकांच्या पैशाची बरबादी म्हणत आहेत. अनेकांनी म्हटले आहे की, अशा गोष्टी आमच्या गावात मोफत शिकायला मिळतात.