COVAXIN Update: हैदराबाद (Hyderabad) स्थित भारत बायोटेक (Bharat Biotech) कंंपनीची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन (COVAXIN) च्या मानवी चाचणीचा (Clinical Trials) दुसरा टप्पा उद्यापासुन सुरु होणार आहे. ड्रग रेग्युलेटर संस्थेतर्फे या चाचण्यांसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे,आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अंतर्गत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून मान्यता मिळाली आहे. भारत बायोटेकला जॉइंट ड्रग्स कंट्रोलर डॉ. एस. इश्वरा रेड्डी यांनी लिहिलेल्या पत्राच्या रूपात ही मंजुरी देण्यात आली. देशभरातील अनेक ठिकाणी लस सध्या टप्प्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये आहे. कोविड-19 वरील लस 2021 वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नसल्याची WHO च्या प्रवक्त्यांची माहिती- Reuters रिपोर्ट्स
प्राप्त माहितीनुसार, BBV152, म्हणजेच Covaxin ची चाचणी ही सुरुवातीला 380 प्र्तिनधींवर करण्यात येणार आहे. फेज 1 चाचणीमध्ये, स्वयंसेवकांची तपासणी दर दोन दिवसांनी केली गेली होती तर आता दुसर्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये हा कालावधी 4 दिवसांपर्यंत वाढविला जाईल. लसीकरणाच्या वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याबाबत सुद्धा इश्वरा रेड्डी यांंनी पत्रात विशेष उल्लेख केला आहे.
दरम्यान, कोवाक्सिनसाठी फेज 1 चाचणी 15 जुलै रोजी देशभरातील 12 केंद्रांवर सुरु झाली होती.यामध्ये प्रतिनिधींंना 14 दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस दिले गेले. पहिल्या टप्प्यातील चाचणी 350 पेक्षा जास्त लोकांवर घेण्यात आली होती आणि अजूनही सुरू आहेत. यापूर्वी एका अहवालात असे म्हटले होते की कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांनी हे सिद्ध केले आहे की कोरोनाव्हायरस विरुद्ध ही लस समाधानकारक परिणाम दर्शवत आहे.